जिल्हा परिषदेच्या सभेवर सदस्यांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:22 AM2019-05-07T00:22:33+5:302019-05-07T00:22:55+5:30
जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये मागील काही दिवसांपासून असलेल्या नाराजीचा उद्रेक आज सर्वसाधारण सभेत झाला. थेट सीईओंना लक्ष करून सदस्य व पदाधिकाऱ्यांनीही सभेवर बहिष्कार टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये मागील काही दिवसांपासून असलेल्या नाराजीचा उद्रेक आज सर्वसाधारण सभेत झाला. थेट सीईओंना लक्ष करून सदस्य व पदाधिकाऱ्यांनीही सभेवर बहिष्कार टाकला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे या होत्या. यावेळी सीईओ एच.पी. तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हादराव राखोंडे, संजय देशमुख, रेणुका जाधव यांची उपस्थिती होती.
सुरूवातीला जि.प.सदस्य बाळासाहेब मगर यांनी जि.प.च्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट अजून का झाले नाही, याची विचारणा केली. विविध विभागांनी ही माहिती गोळा केली नाही. शिक्षण विभागानेही बांधकाम विभागास पत्र दिले असल्याचे सांगितले. त्यावर बांधकाम विभागाने मात्र असे पत्रच मिळाले नसल्याचे सांगितले. यावरून या दोन अधिकाऱ्यांत चांगलीच तू तू- मै मै झाली. त्यात शेवटी सीईओंना मध्यस्थी करण्याची वेळ आली. त्यानंतर शालेय पोषण आहाराची देयके रखडल्याने ती कधी काढणार, असा सवाल जि.प.सदस्य मगर यांनी केला. यावरूनही शिक्षणाधिकारी व कॅफोंमध्ये मतभेद दिसून आला.
यानंतर प्रभाकर नामदेवराव वाघ या शिक्षकाचा प्रश्न मात्र जोरात गाजला. प्रभाकर नामदेव वाघ या शिक्षकास २०१० मध्ये निलंबित केले होते. अजून त्यांना पुन्हा सेवेत अजून घेतले नाही. मात्र त्यांना २०१३ मध्ये पदोन्नती दिली. मात्र वेतनवाढ नाही तर २०१५ मध्ये या शिक्षकास न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. मात्र तरीही तीन वर्षांपासून त्यांना सेवेत घेतले नाही. ४ सप्टेंबर २०१८ व ५ जानेवारी २०१९ अशी दोनदा ही संचिका परत का आली? असा सवाल विठ्ठल चौतमल यांनी केला. मग दोन दिवसांत हा प्रश्न निकाली काढणार आहोत, असे सांगितले. मग प्रत्येक प्रश्न सभेतच मांडल्याशिवाय सुटणार नाही का? असा सदस्यांचा सवाल होता.
...अन् सभेवर बहिष्कार
अध्यक्ष, उपाध्यक्षांनीही हतबलता दाखविली अन् सीईओ कायम बोटचेपी भूमिका घेतात. त्यामुळे सभेत बसून फायदा काय, असा सवाल करीत बहिष्काराची घोषणा केली. त्यानंतर सदस्यांनी सभागृह सोडले. त्यात अंकुश आहेर, विठ्ठल चौतमल, मनीष आखरे, अजित मगर, संजय कावरखे आदींनी चर्चेत सहभाग घेत प्रशासनाचे वाभाडे काढले. सदस्यांना पाठिंबा देत पदाधिकारीही बाहेर पडले. सीईओ व इतर बसून राहिले. काही अधिकारी मध्यस्थीला पदाधिकाºयांकडे आले होते. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर सीईओ तुम्मोड यांनी सर्व अधिकाºयांची बैठक त्यांच्या दालनात घेतली.
अध्यक्ष- उपाध्यक्षही संतप्त
या बैठकीत सदस्यांनी सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीच यात ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र ते पुन्हा अधिकाºयांना उद्देशून बोलत होते. त्यामुळे सदस्य समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांना यावर विचारणा केली. तेव्हा उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले, सदस्य नवीन असल्याने ते चुकताहेत, असे वाटत होते.
मात्र अधिकारी नियमातील कामे करीत नसल्याचे दिसते. त्याचा आणखी मोठा उद्रेक होऊ शकतो. अधिकाºयांत समन्वय नाही. त्यांच्यातील उणे- दुणे विकास कामांवर परिणाम करीत आहेत. कुणालाही कामाप्रति निष्ठा राहिली नाही, अशा शब्दांत ठणकावले. प्रत्येक विभागाचे वाभाडे निघत असतील तर कसे, असा सवाल केला.
जि.प.अध्यक्षा नरवाडे यांनीही मी अनेक दिवसांपासून अधिकारी कामेच करीत नाहीत, हे सांगत आहे. मात्र सीईओ काही ऐकतच नाहीत. सीईओ केवळ बैठका घेतात. त्यांचे कोणी ऐकत नाही. नियमांत बसणारी कामे अडतात कशी, असा सवाल केला.
प्रशासनाला नामोहरम करण्याची एकही संधी सदस्य व पदाधिकारी सोडत नव्हते.