धावत्या बसचे ब्रेकफेल, प्रवाशांमध्ये धडधड वाढली; मात्र, चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला
By विजय पाटील | Published: May 10, 2024 07:58 PM2024-05-10T19:58:23+5:302024-05-10T20:00:18+5:30
बसमधील कोणत्याही प्रवाशांना कसलीही इजा पोहोचली नसल्यामुळे चालकाचे प्रवाशांनी कौतुक केले.
हिंगोली : हिंगोली-पुसेगाव-जांभरुन या चालत्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे सदरील एस. टी. बस पाचशे मीटर बिनाब्रेकची न्यावी लागली. यावेळी चालकाने सतर्कता दाखविल्यामुळे बसमधील ४२ प्रवासी सुखरुपणे खाली उतरु शकले. सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशांना कसलीही इजा पोहोचली नसल्यामुळे चालकाचे प्रवाशांनी कौतुक केले.
१० मे रोजी दुपारी २: १५ वाजता हिंगोली येथून हिंगोली-पुसेगाव-जांभरुन या बसचे दुपारी २: ४५ वाजेदरम्यान नर्सी (नामदेव) जवळील खराटी पुलाजवळील पेट्रोलपंपाजवळ ब्रेकचे जॉईन्डर तुटले. त्यामुळे बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. ही बाब चालकाच्या लगेच लक्षात आली. आपल्या बसमध्ये ४२ प्रवासी आहेत. सर्व प्रवासी सुखरप वाचले पाहिजेत, कोणालाही दुखापत झाली नाही पाहिजे, असा मनाशी विचार करुन बसवर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवत रस्त्याच्याकडेने इतर वाहनाला धक्का न लावता बस व्यवस्थित चालविली. जवळपास ५०० मीटर सदरील बस बिनाब्रेकची नेण्यात आली. नर्सीपासून जवळ असलेल्या जि. प. शाळेसमोर बस आल्यानंतर बस व्यवस्थित उभी करुन प्रवाशांना खाली उतरण्यात आले. यानंतर चालकाने प्रवाशांना बसचे ब्रेक निकामी झाल्याचे सांगितले. चालकाचे हे बोल ऐकताच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
चालकाला होता विश्वास; कोणालाही होणार नाही दुखापत...
बसचे ब्रेक अचानक निकामी झाले असले तरी बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत होणार नाही, याचा विश्वास चालकाला होता. चालक माधव कुंडलिक मालवे यांनी सावकाश बस रस्त्याच्या कडेने नेत, इतर कोणत्याही वाहनाला धक्का न लागता चालविली. चालत्या बसला थांबविणे शक्य नव्हते. त्यामुळे चालकाने प्रयत्नाची पराकाष्टा केली. अखेर चालकाच्या प्रयत्नाला यश आले आणि जि. प. शाळेसमोर येवून बस थांबली. काही प्रवाशांना बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले होते. यावेळी इतर प्रवाशांना सांगितले तर गोंधळ उडून जाईल म्हणून त्यांनी गप्प बसणे पसंत केले.