वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:34 AM2021-09-15T04:34:51+5:302021-09-15T04:34:51+5:30
हिंगोली : वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. हे नियम वाहन चालविणाऱ्यासह समोरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहेत. मात्र ...
हिंगोली : वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. हे नियम वाहन चालविणाऱ्यासह समोरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहेत. मात्र असे असतानाही अनेक चालक नियम तोडून वाहने चालवित असल्याचे दिसून येत आहेत. मात्र वाहतुकीचे नियम तोडल्यास लायसन्सही रद्द होऊ शकते. त्यामुळे वाहतूक नियमाचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
अपघाताच्या घटना घडू नयेत, यााठी शासनाने वाहतुकीसाठी काही नियम घालून दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास वेगवेगळ्या प्रकारचे दंड आकारले जातात. मात्र तरीही काही चालक आपल्या ताब्यातील वाहने भरधाव चालवितात. तसेच मोबाईलवर बोलत वाहने चालविण्याचे फॅड आले आहे. हा प्रकार वाढतच असून यातून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याला आवर घालण्यासाठी लायसन्स रद्द करण्याचा निर्णयही घेतला जावू शकतो. त्यामुळे नियमांचे पालन करूनच वाहने चालविणे फायद्याचे ठरणार आहे.
हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन
- एखाद्या दुचाकी, चारचाकी वा इतर वाहनचालकांनी सिग्नल तोडला तर लायसन्स रद्द होऊ शकते.
-एखाद्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालविल्यास अशा चालकांचेही लायसन्स रद्द केलेे जाऊ शकते.
-वाहन चालवित असताना मोबाईलवर बोलत असल्याचे आढळून आल्यास अशा चालकांचे लायसन्स निलंबित
करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
आधी तीन महिने व नंतर कायमस्वरूपी
बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी अगोदर तीन महिन्यांकरिता वाहन चालविण्याचा परवाना रद्द केला जातो. त्यानंतरही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास अशा चालकांचे कायमस्वरूपी लायसन्स रद्द केले जाऊ शकते.
अशी होते कारवाई
एखादा चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास वाहतूक शाखा अशा चालकांवर दंडात्मक कारवाई करते. त्यानंतरही वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास अशा चालकांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवितात. त्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निर्णय घेतात.
प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एखादा चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यास अशा चालकावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक चालकांनी नियमांचे पालन करावे.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, हिंगोली
दीड वर्षातील कारवाई
२०२०
- मोबाईलवर बोलणे - १०३९
अधिक वेगाने वाहन चालविणे - ५११९
२०२१ (जून अखेर)
मोबाईलवर बोलणे - ६२३
अधिक वेगाने वाहन चालविणे - ३९६८