महामारीतही लाचखोरी जोरात; ग्रामविकास सर्वांत पुढे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:12+5:302021-05-29T04:23:12+5:30
हिंगोली : कोरोनाचे संकट मागील १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना अशाही काळात लाचखोर कर्मचारी, ...
हिंगोली : कोरोनाचे संकट मागील १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना अशाही काळात लाचखोर कर्मचारी, अधिकाऱ्यांना मात्र कोणताही फरक पडलेला दिसत नाही. मागील दीड वर्षाच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने जिल्ह्यात १३ सापळा कारवाई केल्या आहेत. यात सर्वांत पुढे ग्रामविकास विभाग असून, त्यानंतर महसूल विभागाचा क्रमांक लागत आहे.
कोरोना आजाराने सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. दिवसेंदिवस रुग्ण आढळून येत असून, आतापर्यंत १५ हजार ५५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४ हजार ७७९ रुग्ण बरे झाले, तर ३५० जणांना मृत्यूने गाठले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारीही कोरोनायोद्धा म्हणून काम करीत असताना त्याचवेळी काही लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र कोरोना काळातही लाचखोरी केली. मागील दीड वर्षापासून सर्वच क्षेत्रांतील नागरिक कोरोनाने त्रस्त आहेत. तरीही लाचखोरांनी लाच मागण्याचे थांबविले नाही. २०२० यावर्षी येथील लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ११ सापळा कारवाई केली. यात १३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर २०२१ यावर्षी आतापर्यंत दोन सापळा कारवाई करण्यात आली. यावर्षी ग्रामविकास विभागातील पाच, महसूल विभाग तीन, तर कृषी, गृह, आरोग्य विभागातील एका प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली, तर २०२१ या वर्षीही आतापर्यंत दोन प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली.
कोणत्या वर्षात किती कारवाया
२०१९- १३
२०२० -११
२०२१ मे पर्यंत - २
सर्वांत जास्त कारवाया हिंगोली तालुक्यात
२०२० ते २१ यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने १३ कारवाया केल्या. यात सर्वाधिक कारवाया हिंगोली तालुक्यात झाल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील सहा कारवाया झाल्या आहेत. त्यानंतर कळमनुरी तालुक्याचा क्रमांक लागतो. कळमनुरी तालुक्यात तीन, वसमत दोन, तर सेनगाव व औंढा तालुक्यांत प्रत्येकी एक कारवाई झाली आहेे.
कोरोना काळात ग्रामविकासची वरकमाई जोरात
ग्रामविकास विभाग - ५
महसूल - ३
कृषी - २
गृह विभाग - १
आरोग्य विभाग -१
वित्त विभाग - १
कोणताही शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती त्याचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२४५६ - २२३०५५ किंवा ९९२३०४२५६५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.