बैल परवडत नाही म्हणून भाऊ आणि भाच्यानी खांद्यावर घेतले ‘जू’, पैसे आणायचे कुठून?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:40 AM2024-06-25T07:40:31+5:302024-06-25T07:40:41+5:30
हिंगोली जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा, पैसे आणायचे कुठून? बैलजोडीला मोजावे लागतात ६० ते ८० हजार रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क, वसमत (जि. हिंगोली) : अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलजोडी परवडत नाही. बैलजोड्या महाग झाल्याने अल्पभूधारक शेतकरी उत्पन्न काढणार काय अन् लागवड करणार काय? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. अशात शेती मशागत व पेरणीसाठी बैलजोडी मिळाली नसल्याने शेतकरी बालाजी पुंडगे यांनी चक्क सख्खा भाऊ व साडूच्या मुलास औताला जुंपून हळदीच्या शेतात सरी मारली. शेत मुख्य रस्त्यावर असल्याने हा प्रकार अनेकांच्या समोर आला.
अर्धा एकरातील सरी दोघांनी पूर्ण केली
- बालाजी पुंडगे यांना दोन एकर शेतजमीन असून अर्धा एकरावर हळद आहे. भाऊ व इतर परिवार रोज मजुरी व शेतीची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकतात. सोमवारी त्यांनी आपल्या शेतात हळदीसाठी सरी (दौसा) मारण्यास सुरुवात केली.
- सरीसाठी बैल आणायचे कोणाचे आणि कोठून? हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे लहान भाऊ मनोहर पुंडगे व त्यांच्या साडूच्या मुलास औताला जुंपले. दोघांच्या खांद्यावर औताचे जू देऊन सरी पूर्ण केली.
बैलजोडी कशी परवडणार?
- बालाजी पुंडगे यांचे शेत वाई ते बोल्डा मार्गावर आहे. सरी मारताना बैलाऐवजी माणसाद्वारे औत हाकले जात असल्याचे पाहून अनेकांनी त्या ठिकाणी थांबून हा प्रकार पाहिला.
- यावेळी प्रत्येकाजवळ भावुक होत त्यांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या. रोज मजुरी करणारे कुटुंब आम्हाला बैलजोडी कशी परवडणार? बैलजोडी घ्यायची म्हटल्यावर ६० ते ८० हजार मोजावे लागतात, असेही त्यांनी सांगितले.