हुंड्याच्या रकमेसाठीच केली मेव्हण्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:37 PM2019-12-06T12:37:29+5:302019-12-06T12:39:15+5:30
सख्ख्या मेव्हण्याने हुंड्याची रक्कम व शेतीच्या ठोक्याच्या हिशेबावरून हत्या
कळमनुरी,(जि. हिंगोली) : तालुक्यातील लासिना येथील संतोष शंकर डांगे (१४) या शाळकरी मुलाची हत्या त्याच्याच सख्ख्या मेव्हण्याने हुंड्याची रक्कम व शेतीच्या ठोक्याच्या हिशेबावरून केल्याचे उघड झाले आहे.
संतोषचा खून त्याचा मोरवाडी येथील मेव्हणा तातेराव जगदेवराव सूर्यवंशी व कैलास सूर्यवंशी यांनी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. २ डिसेंबर रोजी आरोपी तातेराव सूर्यवंशी याने संतोषला जुन्या बसस्थानकावर गाठून गोडीगुलाबीने जीपने शेंबाळपिंपरीकडे नेले. शेंबाळपिंपरीत हॉटेलमध्ये खिचडी, भजे खाल्ले. त्यानंतर क्रुझर मुळावा, उमरखेडकडे नेली. रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून संतोषचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह केबलसाठी खोदलेल्या खड्ड्यात पुरला. इकडे संतोष डांगे याचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद त्याचे वडील शंकर डांगे यांनी कळमनुरी पोलिसांत दिली होती.
३ डिसेंबर रोजी संतोषचा मृतदेह शेतकऱ्यांना आढळला. मयताचे वडील शंकर डांगे यांनी त्यांचे जावई तातेराव सूर्यवंशीवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ५ डिसेंबर रोजी आरोपी तातेराव व कैलासला येथील न्यायालयासमोर उभे केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.