अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात; कयाधू नदीपात्रात सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 02:51 PM2023-10-21T14:51:32+5:302023-10-21T14:53:11+5:30
शेवाळा येथील घटना; खेळताना पाय घसरून पडल्याचा अंदाज
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : शेवाळा येथील दोन बालके खेळताना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. दिवसभर शोधूनही ते सापडले नाहीत. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेवाळा येथील कयाधू नदीच्या पात्रात त्या दोघांचे मृतदेह सापडले. चिमुकल्यांचे मृतदेह सापडताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळा येथील साधारणतः तीन ते साडेतीन वर्षे वयाची दोन बालके २० ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बेपत्ता असल्याची खबर मिळाली. स्वराज दीपक सूर्यवंशी आणि शिवराज संदीप सूर्यवंशी हे दोघेजण सकाळी गावातील मंदिराच्या शेजारी नेहमीप्रमाणे खेळत होते. परंतु सकाळी ११ वाजल्यानंतर ते दोघे दिसेनासे झाले. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण ते सापडत नव्हते.
सर्व नातेवाइक, गावातील सर्व जागा, शेताकडे असा सर्वत्र शोध घेतला. पण सापडत नसल्याने सोशल मीडियावर दोन बालके हरवली असल्याचे संदेश सर्वत्र टाकण्यात आले. दिवसभर सर्वत्र शोध घेण्यात आला. कयाधू नदीपात्रातही शोध घेतला. परंतु ते काही सापडले नाहीत. शेवाळा येथील मंदिराजवळील पायऱ्यानंतर एका ठिकाणी पाय घसरल्याची ओळखण आढळली. तिथेही दिवसा शोध घेतला. परंतु सापडले नाहीत. अखेर सायंकाळी साडेसहा सात वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात त्या ओळखणीजवळ माणसांना खाली सोडण्यात आले. त्यावेळी दोघेही भाऊ हातात हात घेऊनच तिथे मृतावस्थेत आढळल्याने एकच धक्का बसला. मृतदेह पाहताच नातेवाइकांनी टाहो फोडला.
अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात
दोघे चुलत भाऊ. दोघांची नेहमीची गट्टी. एकत्रितच खेळायचे. आज दोघेही एकाच वेळी खेळताना गायब झाले. स्वराज आणि शिवराज यांची दोस्ती पक्की होती. दिवसभराच्या शोधानंतर कयाधू नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. तेव्हाही दोघांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट पकडलेले होते. अखेरच्या क्षणीही भावाचा हात सोडला नाही. हे दृश्य पाहून उपस्थित गहिवरून गेले होते.