घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक आरोपी अटकेत, ७ च्या मागावर पोलीस यवतमाळकडे
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: October 6, 2022 04:41 PM2022-10-06T16:41:14+5:302022-10-06T16:41:39+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यासह यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दापाश केला आहे. यातील एका आरोपीस बेड्या ठोकल्या असून त्याने सहा ठिकाणच्या घरफोडीची कबूली दिली. इतर ७ साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपीकडून १ लाख ६३ हजार रूपये किमतीचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर व वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत तसेच जवळील नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सीमावर्ती भागात चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ग्रामस्थ व व्यापाऱ्यात भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे पथक काही दिवसांपासून चोरट्यांच्या मागावर होते. या घरफोड्या सोनाजी चंपती शिंदे (रा. पारधी वस्ती टोकाई, बागल पार्डी) याने व त्याचे नांदेड जिल्ह्यातील साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सोनाजी शिंदे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत चार ठिकाणी तर वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबूली दिली. यात जाकी बावाजी चव्हाण (रा. सोनारी ता. हिमायतनगर), मागींलाल श्रीरंग राठोड उर्फ भोसले (रा. हिमायतनगर जि.नांदेड), विकास श्रीरंग राठोड उर्फ चव्हाण (रा. हिमायतनगर जि.नांदेड), निलेश बबरसिंग राठोड, दत्ता मागीलाल राठोड उर्फ भोसले (रा.नागेशवाडी ता. हिमायतनगर), सतीष गणपत राठोड (रा. हिमायतनगर), बाबूलाल भावजी चव्हाण (रा. हिमायतनगर जि.नांदेड) यांचा सहभाग असल्याचे त्याने सांगितले. आरोपींनी गुन्ह्यातील रोख रक्कम व दागीने वाटून घेतले. यातील सोनाजी शिंदे या आरोपीच्या हिश्याला आलेले सोन्याच्या अंगठ्या, कानातले रिंग, सोन्याचे पेंडाल, मणी आदीं १ लाख ३ हजार रूपये किमतीचे ३१ ग्रॅम सोन्याचे दागीने, १० हजारांचा मोबाईल, तसेच ५० हजार रूपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ६३ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, सुनिल गोपीनवार, शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे, भगवान आडे, सुनिल अंभोरे, शेख शकील, नितीन गोरे, पारू कुडमेथा, विशाल घोळवे, राजू ठाकुर, शंकर ठोंबरे, ज्ञानेश्वर सावळे, विठ्ठल काळे, आकाश टापरे, रविना घूमनर, किशोर सांवत, ज्ञानेश्वर पायघन, चालक प्रशांत वाघमारे, सुमित टाले, रोहीत मुदीराज, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण यांनी केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळकडे रवाना
घरफोडी घटनेतील इतर फरार ७ आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ जिल्ह्यात रवाना झाले आहे. लवकरच फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येणार असून मुद्दमालही जप्त केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस पथकही या चोरट्यांच्या मागावर होते.