पावसामुळे बसचे वेळापत्रक विस्कटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:08+5:302021-07-23T04:19:08+5:30
हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, या पावसामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बसचे वेळापत्रक बिघडले. दुसरीकडे बसफेऱ्याही कमी करण्यात ...
हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, या पावसामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बसचे वेळापत्रक बिघडले. दुसरीकडे बसफेऱ्याही कमी करण्यात आल्याचे एस. टी. महामंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
मंगळवारपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. पावसामुळे बसच्या फेऱ्यांवरही परिणाम जाणवला असून, काही ठिकाणच्या बसफेऱ्या बंद कराव्या लागल्या. रिसोड मार्गावर दोन बसफेऱ्या होत्या, यापैकी १ फेरी बंद करण्यात आली. पुसद मार्गावर ३ फेऱ्या असू, या मार्गावरील १ फेरी बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे परभणी जिल्ह्यासाठी सोडण्यात येणाऱ्या सर्वच बसेस उशिराने सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागला. पावसादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, प्रवाशांची काळजी घ्यावी, अशा सूचना एस. टी. महामंडळाने चालक-वाहकांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील रिसोड, परभणी आणि पुसद या भागात काही ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालककांना बस चालविताना अतोनात त्रास होतो. याकरिता काही बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. पाऊस उघडल्यानंतर सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू केल्या जातील, असे महामंडळाने सांगितले.
डिझेलचा साठा भरपूर प्रमाणात...
डिझेल संपल्यामुळे काही गावांच्या बसफेऱ्या बंद केल्या आहेत, असे प्रवाशांतून बोलले जात आहे. दहा दिवसांपूर्वी डिझेल संपल्यामुळे लांब पल्ल्यांच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. आजमितीस डिझेल भरपूर प्रमाणात आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे नाईलाजास्तव काही ठिकाणच्या बसफेऱ्या पावसामुळे बंद कराव्या लागल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ देऊ नका, अशा सूचना चालक-वाहकांना दिल्या आहेत.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली आगार