हिंगोलीत वसमतजवळ बस पेटविली; तर शिरड शहापूर येथे बसवर दगडफेक
By विजय पाटील | Published: February 16, 2024 03:39 PM2024-02-16T15:39:10+5:302024-02-16T15:40:30+5:30
प्रवाशांना खाली उतरवत एसटी बस पेट्रोल टाकून पेटवून दिली.
हिंगोली: वसमत शहरापासून जवळ असलेल्या परभणी मार्गावरील खांडेगाव पाटीवर शुक्रवारी वसमत येथून परभणी येथे प्रवासी घेऊन निघालेली बस अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळली. यावेळी बसला लागलेल्या आगीत एस.टी. महामंडळाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यातील सेनगाव, वसमत, कळमनुरी, औंढा आदी ठिकाणी १६ फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
वसमत ते परभणी मार्गावर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२: ३० वाजेदरम्यान वसमत आगाराची बस (क्र. एमएच १३ सीयू ८४२३) ही परभणीकडे प्रवासी घेऊन जात असताना खांडेगाव पाटीवर अज्ञातांनी बस आडविली. त्यातील प्रवाशांना खाली उतरवत एसटी बस पेट्रोल टाकून पेटवून दिली. बसला लागलेल्या आगीत बस जवळपास पूर्णतः जळली असल्याने मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना कळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, अजय पंडित, संजय गोरे, अंबादास विभुते, लोखंडे, अविनाश राठोड आदींनी भेट देऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
शिरड शहापूर येथे एसटी बसवर दगडफेक
औंढा ते वसमत राज्य रस्त्यावरील शिरड शहापूर येथील रस्त्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन सकाळी ११ वाजेदरम्यान करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी वसमत आगाराची वसमत ते औंढा बस (क्रमांक एमएच ४० एन ८४५७) आली असता अज्ञातांनी बसवर दगडफेक केली. यावेळी बसच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सदरील बस पेट्रोलपंपावर नेऊन सुरक्षित ठिकाणी उभी केली.