प्रवाशांच्या सोयीकरिता जिंतूरमार्गे बसेस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:49+5:302021-07-02T04:20:49+5:30
हिंगोली : डेल्टा प्लस आजाराच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने परभणी-हिंगोली बस सेवा २९ जूनपासून बंद केली आहे. त्यामुळे ...
हिंगोली : डेल्टा प्लस आजाराच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने परभणी-हिंगोली बस सेवा २९ जूनपासून बंद केली आहे. त्यामुळे हिंगोली आगाराने औरंगाबादला जाणाऱ्या बसेस रिसोडमार्गे सुरू केल्या होत्या. परंतु, रिसोडमार्गे किलोमीटर जास्त होत असल्याने जिंतूर मार्गे बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
परभणी जिल्हा प्रशासनाने २९ जूनपासून ३ जुलैपर्यंत परभणी आगाराची बस हिंगोलीला जाणार नाही आणि हिंगोली आगाराची बस परभणीला येणार नाही, असा आदेश काढला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून औरंगाबादला जाणाऱ्या बसेस २९ जूनपासून रिसोड मार्गे जात होत्या. रिसोडमार्गे औरंगाबादला जाण्यासाठी किलोमीटरमध्ये वाढ होत असल्यामुळे हिंगोली एस. टी. आगाराने औरंगाबादला जाणाऱ्या सर्व बसेस यापुढे जिंतूर मार्गे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादला जाणारी प्रत्येक बस जिंतूर आगारात न जाता जिंतूरच्या बाहेरूनच औरंगाबादला घेऊन जावी, असेही चालक आणि वाहकांना सूचित केले आहे. एस. टी. आगाराच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून परभणी जिल्ह्यातील झीरो फाटापर्यंत बसेस सोडण्यात येत आहेत, असेही हिंगोली आगाराने सांगितले.
हिंगोली ते कोल्हापूर बस बंद
हिंगोली ते कोल्हापूर बस परभणीमार्गे जात होती. परंतु, पुढील आदेश येईपर्यंत ती बंद करण्यात आली आहे. कोल्हापूरसाठी दुसरा मार्ग नाही, त्यामुळे ही बस बंदच करण्यात आली आहे. हिंगोली ते सोलापूर जाणारी बस परभणी मार्गे न पाठविता नांदेड मार्गे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली ते पुणे, हिंगोली ते औरंगाबाद, हिंगोली ते नाशिक, पुसद ते मुंबई या सर्व बसेस पुढील आदेश येईपर्यंत जिंतूर आगारात न जाता बाहेरून औरंगाबादला जातील.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली
एस. टी. लोगो घेणे.