महावितरणचा अभियंता भासवून बनावट सोने विक्रीचा धंदा; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
By रमेश वाबळे | Published: June 5, 2023 04:46 PM2023-06-05T16:46:20+5:302023-06-05T16:46:45+5:30
हिंगोलीच्या स्थागुशाची कारवाई, ३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त
हिंगोली : महावितरणचा अभियंता असल्याचे भासवून बनावट सोने विक्री व गहाण करण्याच्या प्रयत्नातील एका तोतयास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी हिंगोली- कळमनुरी महामार्गावरील एका हाॅटेलसमोरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट ओळखपत्रासह कार असा एकूण ३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वीच तरूणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखों रूपये उकळल्याप्रकरणी एका तोतया जिल्हाधिकाऱ्यास हिंगोली पोलिसांनी बेड्या घातल्या होत्या.
जिल्ह्यात बनावट सोने विक्री करणारी टोळी वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या टोळीकडून गोल्ड लोन फायनान्समध्येही बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळाल्यानंतर पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांना सूचना केल्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात पथक नेमण्यात आले. या पथकाने ५ जून रोजी हिंगोली - कळमनुरी महामार्गावरील एका हाॅटेलसमोर कारवाई करीत त्या ठिकाणाहून एम.एच.४६ एडी ५७९४ ही कार व योगेश सुभाष इंगोले (रा.लासीना ता.जि.हिंगोली) यास ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली असता साथीदार संतोष देशमुख याच्या सोबत मिळून बनावट सोन्याच्या बांगड्या हिंगोली येथील सराफा दुकानावर विक्री व गोल्ड लोन फायनान्सवर गहान ठेवण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. पोलिसांनी योगेश इंगोले यास ताबत्यात घेत त्याच्याकडून बनावट ओळखपत्र, कार, मोबाइल असा एकूण ३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. योगेश हा त्याच्या कारवर ‘महाराष्ट्र शासन महावितरण’ असे स्टीकर लावून वावरत होता. तसेच स्वत: महावितरणचा अभियंता असल्याचे भासवित होता. याप्रकरणी योगेश इंगोले व संतोष देशमुख यांच्या विरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, अंमलदार लिंबाजी वाव्हळे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, हिरभाऊ गुंजकर यांनी केली.
बनावट नोटा प्रकरणातील आरोपी...
तोतया अभियंता योगेश इंगोले याच्यासोबत मिळून बनावट सोने विक्री व गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणारा संतोष देशमुख हा यापूर्वीच्या उघड झालेल्या बनावट नोटा प्रकरणातील आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे याप्रकरणाचा सर्व बाजूने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता ...
आरोपींनी बनावट सोने आणले कुठून आणि आत्तापर्यंत ते सोने किती लोकांना विक्री केले. तसेच कोणकोणत्या गोल्ड फायनान्समध्ये गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.