कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:28+5:302021-06-26T04:21:28+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच नियमांचे ...

Can't the police hear the horn, brother? | कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ ?

कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ ?

Next

हिंगोली : जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी कर्णकर्कश हॉर्न वाजविणारे चालक मात्र या कारवाईतून सुटत आहेत. त्यामुळे कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक बनले आहे.

हिंगोली जिल्ह्यात मोठी शहरे नसल्याने वाहतुकीचा प्रश्न फारसा उद्भवत नाही. तरीही अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात पटाईत आहेत. नो पार्किंग, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे, अधिक वेग, फॅन्शी नंबर प्लेट लावणे आदी प्रकरणी दंडात्मक कारवाई होत असली तरी मागील दीड वर्षात कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकांवर क्वचित कारवाई झाल्याची माहिती आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजविण्याऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईसाठी थांबविले तर समोरील व्यक्तीने रस्त्याच्या बाजूला व्हावे, अपघात होऊ नये म्हणून हॉर्न वाजविल्याचा बचाव वाहनचालक करीत आहेत. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई करायची कशी, असा प्रश्नही वाहतूक पोलिसांना पडला आहे. त्यात राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाने वाहतूक पोलीसही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत नसल्याने असे वाहनचालक बिनबोभाट हॉर्न वाजवित आहेत. यामुळे कानाचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे बनले आहे.

फॅन्सी हॉर्नची फॅशन

नवीन वाहन घेतल्यानंतर अशा वाहनांना फॅन्सी हॉर्न बसविण्याची स्पर्धा युवकांमध्ये आहे. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी असे हॉर्न बसविण्यात येतात. मित्राने कर्णकर्कश हॉर्न बसविल्यानंतर दुसरा मित्रही असे हॉर्न बसविण्याला प्राधान्य देतो.

कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर...

कर्णकर्कश हॉर्न वाजविल्यानंतर विविध कलमान्वये दंड करण्याची तरतूद आहे. यात केंद्र व राज्य शासनाचा स्वतंत्र कायदा आहे. सायलंट झोनमध्ये हॉर्न वाजविल्यानंतर २०० रुपये दंड आकारला जातो. त्याशिवाय अनेकवेळा हॉर्न वाजविल्यास दंडाची रक्कम ५०० रुपयांपर्यंतही जाऊ शकते. मात्र, हिंगोलीसारख्या शहरात शंभर रुपये दंड आकारला तरीही वाहनचालकांतून ओरड होते.

ध्वनिप्रदूषणामुळे व्यक्तींच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. हृदयावर ताण येणं, हार्ट अटॅक येणे, रक्तदाब वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सतत मोठा आवाज कानावर पडला तर बहिरं होण्याची शक्यता असते, तसेच कानाच्या आतल्या पेशीला इजा होऊन ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिंगोली शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. वाहनचालकांनीही नियमांचे पालन करावे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

-विद्यासागर श्रीमनवार, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, हिंगोली.

वाहनचालकांना झालेला दंड २०२० व जून २०२१ पर्यंत

नो पार्किंग -

२०२० -१६४००

२०२१ -६३९९

धोकादायक वाहन चालविणे -

२०२० -४०४७

२०२१ -७३९

मोबाईलवर बोलणे -

२०२० -१०३९

२०२१ -६२३

विनापरवाना -

२०२०- ८००२

२०२१ -५७

Web Title: Can't the police hear the horn, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.