साडेपाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 07:09 PM2019-09-17T19:09:56+5:302019-09-17T19:12:27+5:30
साडेपाच लाख रूपये आरटीजीएसद्वारे दुसऱ्या खात्यात जमा करून अपहार
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून सेवानिवृत्त शिक्षकाच्या खात्यातील साडेपाच लाख रुपये आरटीजीएसद्वारे परस्पर दुसऱ्या खात्यात टाकून उचलून घेतल्याप्रकरणी बँकेचे कर्मचारी आर.डी.पतंगे यांच्यावर उपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली.
औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना येथील सेवानिवृत्त शिक्षक रमेश वसंतराव थोरात यांचे शिरडशहापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते होते. या खात्यात त्यांनी ९ लाख रुपये जमा ठेवले होते. नंतर काही दिवसांनी त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातील साडेपाच लाख रूपये आरटीजीएसद्वारे दुसऱ्या खात्यात जमा करून साडेपाच लाख रुपये १७ जुलै रोजी परस्पर उचलून घेतल्याचे आढळले. यासंदर्भात थोरात यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित कर्मचाऱ्याने ती रक्कम परस्पर उचलून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरिष्ठांनी साडेपाच लाख रुपये रुपये पतंगे यांच्याकडून वसुल करून खातेदाराच्या नावावर ती रक्कम जमा करून टाकली.
बँक कर्मचारी पतंगे यांना तात्काळ निलंबितही करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका इन्स्पेक्टर प्रल्हाद संभाजी भालेराव यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात बँकेचे कर्मचारी आर.डी.पतंगे यांच्याविरूद्ध साडेपाच लाख रुपयांचा अपहार करून खातेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२०, ४०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रकाश नेव्हल, पोकाँ एस.जी.भिसे, बी.जी.म्हात्रे आदी करीत आहेत.