हिंगोलीत दुचाकीवरून मोठ्या रक्कमेची वाहतूक; १४ लाख ५० हजारांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 03:40 PM2024-11-11T15:40:07+5:302024-11-11T15:42:31+5:30

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

Cash of 14 lakh 50 thousand seized in Hingoli; The amount was being taken on a bike | हिंगोलीत दुचाकीवरून मोठ्या रक्कमेची वाहतूक; १४ लाख ५० हजारांची रोकड जप्त

हिंगोलीत दुचाकीवरून मोठ्या रक्कमेची वाहतूक; १४ लाख ५० हजारांची रोकड जप्त

हिंगोली : येथील वाशिम रोडवरील पिपल्स बँक परिसरातील कागलीवाल दुकानासमोर दुचाकीवरून बॅगमध्ये १४ लाख ५० हजारांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही कारवाई ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पंचनामा करून रोख रक्कम जप्त करण्यात आली.  

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, हिंगोली शहरातून दोघेजण एका दुचाकीवरून मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास वाशिम रोडवरील पिपल्स बँक परिसरातील कागलीवाल यांच्या दुकानासमोर एमएच ३८ एसी ३८२७ क्रमांकाच्या दुचाकीस थांबविले. दुचाकीवरील दोघांना नाव गाव विचारले असता त्यांनी अरविंद प्रकाशआप्पा बीडकर, अजय बबनराव उंडकर (दोघे रा. सेनगाव) अशी नावे सांगितली. त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात मोठी रक्कम आढळून आली. दुचाकीसह रोख रक्कम पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आली. 

स्थागुशा व एफएसटी पथकाने रक्कम मोजली असता १४ लाख ५० हजारांची रक्कम आढळून आली. रोख रक्कम वाहतुकीचे कारण समाधानकारक वाटले नसल्याने रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही कार्यवाही पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार प्रेमदास चव्हाण, लिंबाजी वाव्हुळे, राजू ठाकूर, विशाल खंडागळे, किशोर सावंत, माधव शिंदे, रवी स्वामी, बी.जी. कऱ्हाळे, तसेच एफएसटी पथक नोडल अधिकारी अरविंद मुंढे, पथकप्रमुख ए.एन. बहिर, एस.एम. कोटे, ए.एस. मस्के, बी.जे. खंदारे, आर.डी. भोसले यांच्या पथकाने केली.  

जिल्ह्यात तिसरी कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी २५ ऑक्टोबर रोजी हिंगोली शहरात दोन वाहनांत १ कोटी ४० लाख ३७ हजार ५०० रूपयांची रोकड आढळून आली होती. वसमत येथे १० नोव्हेंबर एका कारमधून २ लाखांची रक्कम पथकाने जप्त केली आहे. त्यानंतर ही तिसरी कार्यवाही करण्यात आली.

Web Title: Cash of 14 lakh 50 thousand seized in Hingoli; The amount was being taken on a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.