दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली; हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार दोघांचा समावेश
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 24, 2023 01:33 PM2023-03-24T13:33:24+5:302023-03-24T13:33:45+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; सहा जणांविरूद्ध गुन्हा
हिंगोली: दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही कारवाई हिंगोली ते औंढा रोडवरील संतुक पिंपरी शिवारात २३ मार्च रोजी रात्री ११.५० च्या सुमारास केली. त्यांच्याकडून लोखंडी सुरा, खंजर, लोखंडी रॉड, दोरी आदी साहित्य जप्त केले. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
हिंगोली ते औंढा रोडवरील संतुक पिंपरी शिवारात काहीजण संशयास्पद फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना काळे, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार संभाजी लेकुळे, गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हूळे, गणेश लेकूळे, ज्ञानेश्वर पायघन, प्रशांत वाघमारे आदींच्या पथकाने गुरूवारी रात्री ११.५० वाजता संतुक पिंपरी शिवार गाठले. येथील स्वामी विवेकानंद गुरूकुल परिसरात सहाजण आढळून आले. यातील संजय उर्फ काळ्या पंडित काळे, करण जिलान्या पवार, सुनील बाबाराव काळे, मधूकर पंडित काळे (सर्व रा. लिंबाळा मक्ता) हे चौघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले. तर विजय किशन काळे (रा. लिंबाळा मक्ता) व रामा जंगल्या चव्हाण (रा. देवाळा) हे दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या चौघाकडून लोखंडी सुरा, खंजर, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पुड आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी साहित्य जप्त केले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दोघांविरूद्ध हद्दपारीचे आदेश
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांपैकी संजय उर्फ काळ्या पंडित काळे व करण जिलान्या पवार या दोघांविरूद्ध हिंगोली जिल्ह्यातून २ वर्षाकरिता हद्दपार करण्यात आल्याचे आदेश आहेत. तरीही हिंगोली जिल्ह्यात दाखल होत दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना आढळून आले.