गणेशमूर्ती विसर्जनस्थळी राहणार सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:37+5:302021-09-19T04:30:37+5:30
हिंगोली : येथील कयाधू नदी, सिरेकशहा बाबा तलाव व तलाबकट्टा तलावात गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यानिमित्त हिंगोली ...
हिंगोली : येथील कयाधू नदी, सिरेकशहा बाबा तलाव व तलाबकट्टा तलावात गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यानिमित्त हिंगोली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गणेश विसर्जनस्थळी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. याशिवाय विद्युतप्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात १० सप्टेंबर रोजी गणेशमूर्तीची शांततेत स्थापना करण्यात आली आहे. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविल्याने जिल्ह्यात २९६ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना करण्यात यश आले. तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठका घेऊन त्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. आता १९ सप्टेंबर रोजी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यासाठी हिंगोली शहरातील कयाधू नदी, सिरेकशहा बाबा तलाव व तलाबकट्टा तलाव या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे व नगरपालिकेच्या पथकाने सुरक्षेच्या दृष्टीने गणेशमूर्ती विसर्जन स्थळाची पाहणी केली. तसेच या ठिकाणी बॅरिकेड उभारून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. विद्युत प्रकाशाची व्यवस्थाही करण्यात आली असून गणेशमंडळांनी शांततेत गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंदोबस्तासाठी १० अधिकारी, ५३ कर्मचारी
हिंगोली शहरात गणेशमूर्ती विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हिंगोली शहरात १० पोलीस अधिकारी, ५३ पोलीस कर्मचारी तसेच ८० गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय एसआरपीएफच्या दोन तुकडी तैनात करण्यात आल्या आहेत. शनिवारपासूनच ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
हिंगोली शहरात ७६ गणेशमूर्तींची स्थापना
हिंगोली शहरात जवळपास ७६ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय घरोघरीही काही गणेश भक्तांनी गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात यावर्षी जवळपास ९८० सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच २८६ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे.