केंद्राचे अधिकारी तळ ठोकून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:58 PM2018-04-26T23:58:53+5:302018-04-26T23:58:53+5:30
जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी याबाबत अनेक बैठका घेतल्या. आजही अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, खुदाबक्ष तडवी, गोविंद रणवीकर, डॉ.राहुल गिते, शांतीलाल चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. केंद्र शासनाचे अधिकारी उपसचिव सोनकुसरे तसेच सहसचिव अख्तरुल हनिफ हे हिंगोलीत तळ ठोकून आहेत. यात कळमनुरीतील तुप्पा, सेनगावातील सिंदेफळ, वसमतचे कौडगाव व हिंगोलीतील देवठाणा आणि कलगाव या गावांचा समावेश आहे. ते या गावांचे दौरे करीत असून ग्रामस्थांमधून या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जाणून घेत आहेत. ग्रामस्थांना निकषात बसत असल्यास व पात्र असल्यास सात योजनांचा लाभ द्यावयाचा आहे. यात प्रधानमंत्री जनधन योजनेत १00 टक्के बँक खाते उघडणे अभिप्रेत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत प्रतिव्यक्ती १२ रुपये याप्रमाणे विमा उतरावयाचा आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबास २ लाखांची मदत मिळते. तर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत ३३0 रुपये विमा भरल्यास २ लाखांची जोखीमहमी आहे. प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजनेचे कामही सुरू आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. मिशन इंद्रधनुषअंतर्गत बालके व महिलांना लसीकरण होेणार आहे. तर प्रधानमंत्री उजाला योजनेत ५0 रुपयांत एलईडी बल्बची व्यवस्थाही आहे. १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ही योजना सुरू झाली. आता २८ एप्रिलला ग्रामस्वराज्य दिन, २ मे रोजी किसान दिन, ५ मे रोजी अजिविका दिवस साजरा होणार आहे.
तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरणासाठी शिबीर घेतले. यात अनुसूचित जातीतील २१0, अनुसूचित जमातीतील १७ व इतर १२२ अशा एकूण ३४९ कुटुंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून वीज जोडणी दिली. दारिद्र्य रेषेखालील कुटूंबियांना विनामूल्य
तर इतर गरिब परस्थिती असलेल्या कुटुंबियांना 50 रुपये प्रतिमहिना याप्रमाणे केवळ पाचशे रूपयांत वीज जोडणी दिली आहे. यामध्ये तुप्पा ८२, सिंदेफळ ४३, कौडगाव-७५, देवठाणा-८0 व कालगावला ६९ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे.
प्रथमच केंद्र शासनाचे अधिकारी एखाद्या जिल्ह्यात तळ ठोकून बसल्याचे चित्र आहे. तर या योजनेत ग्रामस्थांना थेट लाभ मिळत आहे. त्यामुळे ज्यांना यात लाभ मिळत आहे, त्यांचे चेहरे आनंदाने उजळत आहेत.