अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार; अनेक प्रश्न अनुत्तरित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:41+5:302021-05-15T04:28:41+5:30
हिंगाेली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच ...
हिंगाेली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार शासन करीत असले तरी परीक्षा नेमकी कशी घ्यायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी कोणते निकष लावले जाणार याची चिंताही आहे. हिंगोली जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशासाठी ओढाताण होत नसली तरी मोठ्या शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी पालक मेटाकुटीला येतात. अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची ऑफलाइन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. यातील गुणावरच अकरावीचे प्रवेश निश्चित करण्याचा मानस आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणाऱ्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा कोरोनाकाळात कशी घ्यायची याचे आव्हानही शिक्षण विभागासमोर आहे. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्याच्या अजून स्पष्ट मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याने शिक्षक, विद्यार्थीही गोंधळात आहेत. यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय ?
दहावीत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
ऑनलाइन सीईटी झाली तर ग्रामीण भागाचे काय ?
कोरोनामुळे ऑनलाइन सीईटी घेण्याचा विचार केला तर याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. ग्रामीण भागात नेटवर्क अभाव तसेच ॲण्ड्राइड मोबाइल अनेक विद्यार्थ्यांकडे नाहीत. यातून परीक्षेला मुकावे लागण्याची भीती आहे.
ऑफलाइन झाले तर कोरोनाचे काय ?
ऑफलाइन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यात पुन्हा ऑफलाइन परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंतर्गंत मूल्यमापन कसे होणार ?
दहावीतील विद्यार्थ्याचे अंतर्गत मूल्यमापन बहुतांश शाळांत झाले नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्याचे अंतर्गंत मूल्यमापन कसे करायचे याच्या मार्गदर्शक सूचनाच अनेक शाळांना मिळाल्या नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. मार्गदर्शनक सूचना मिळाल्यानंतरच मूल्यमापन करणे शक्य होणार आहे.
शिक्षक, प्राचार्य म्हणतात...
दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश कसा द्यायचा ? याबाबत अद्याप कोणत्याही सूचना वरीष्ठांकडून मिळाल्या नाहीत. अकरावी प्रवेशासंदर्भात ज्या सूचना मिळतील, त्यानुसार पुढील प्रक्रीया राबविली जाईल.
- नारायण करंडे, प्राचार्य, राजर्षी शाहू विद्यालय
अकरावीत प्रवेश देण्यासाठी कोणते तरी निकष ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांंवर अन्याय होणार नाही. तसेच ऑनलाईन सीईटी घ्यायची झाल्यास ग्रामीण भागात अनेक अडचणी येतील.
-गजानन असोलेकर, जिल्हाध्यक्ष, जुक्टा संघटना
काय म्हणते आकडेवारी...
अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा १२०८६
हिंगोली शहरातील एकूण जागा १५८५