२८ रोजी सभापती निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:27 AM2019-01-19T00:27:06+5:302019-01-19T00:27:25+5:30
आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता फोडाफोडी व इतर बाबींच्या भीतीपोटी नवनिर्वाचित संचालकांना सहलीवर पाठविले आहे. तर पदाधिकारी निवडीच्या सभेची तारीख निश्चित होत नसल्याने खर्चाच्या भीतीने पॅनलप्रमुखांच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता. मात्र २८ जानेवारीला पदाधिकारी निवडीची सभा ठेवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता फोडाफोडी व इतर बाबींच्या भीतीपोटी नवनिर्वाचित संचालकांना सहलीवर पाठविले आहे. तर पदाधिकारी निवडीच्या सभेची तारीख निश्चित होत नसल्याने खर्चाच्या भीतीने पॅनलप्रमुखांच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता. मात्र २८ जानेवारीला पदाधिकारी निवडीची सभा ठेवली आहे.
आखाडा बाळापूर बाजार समितीची निवडणूक ही सहकार खात्याच्या नव्या नियमानुसार झाली. मतदारसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचताना सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या नाकीनऊ आले होते. यात अनेकांना संचालक होणेही महागात पडले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या १0 तर भाजप-सेना युतीच्या ८ जागा आल्या आहेत. मात्र त्यात दोन्हींकडूनही दावे-प्रतिदावे केले जात असल्याने खबरदारी म्हणून सदस्य सहलीवर नेण्याची तयारी करण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर गेले आहेत. यात काँग्रेसचेच बहुतांश सदस्य असून राष्ट्रवादीला बहुतांश ठिकाणी अपयशाचेच धनी व्हावे लागल्याने युतीला चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. मात्र आता फोडाफोडीत काही सदस्य गळाला लागल्यास हाती आलेली संधी जाण्याच्या भीतीने आघाडीने सदस्य बाहेर पाठविले. तर दुसरीकडे युतीचे सदस्य मोकळेच असल्याने चुकून त्यांच्याच सदस्यांना आघाडीने गळाला लावू नये म्हणजे मिळविले.
शुक्रवारी आखाडा बाळापूर बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीची तारीख जिल्हा प्रशासनाने काढली आहे. २८ जानेवारी रोजी ही सभा घेण्यात येणार आहे. यात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे बाळापूर बाजार समितीत पीठासीन अधिकारी म्हणून ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. तहसीलदार व सहा निबंधक त्यांना साह्य करतील.
निवडणुकीची तारीख निघाल्याने पॅनलप्रमुखांना हायसे वाटत असेल. मात्र तरीही तब्बल दहा दिवस हे संचालक सांभाळावे लागणार आहेत. यामध्ये किती आर्थिक झळ बसेल, हा वेगळा प्रश्न. त्यातही फोडाफोडी करणाऱ्यांना तर त्याहीपेक्षा मोठा भुर्दंड बसू शकतो.
एकंदर पदाधिकारी निवडीसाठी दोन्ही पॅनलप्रमुख जोरात असले तरीही नव्या नेतृत्वाचा उदय यातून होणार की, जुन्या अनुभवी चेहºयाच्या स्वाधीन बाजार समिती केली जाईल, हा प्रश्नच आहे. एक-दोन वगळता सर्वच संचालक नव्या फळतील आहेत. तसेही दत्ता बोंढारे व दत्ता माने ही दोनच नावे निवडणुकीत चालली. राजकारणात काहीही होवू शकते. त्यामुळे अनुभवी चेहराही समोर येवू शकतो.
बाळापूर बाजार समिती सभापती-उपसभापती निवडीबाबत माजी खा.शिवाजी माने यांना विचारले असता ते म्हणाले, शेवटच्या क्षणी आम्ही अपेक्षित संचालकसंख्या जोडू. युतीकडेच बाजार समिती येईल, याची पूर्णपणे तयारी केलेली आहे. निवडीच्या दिवशी ते लक्षात येईल. तर विद्यमान आ.संतोष टारफे म्हणाले, आघाडीचे सदस्य सुरक्षितस्थळी आहेत. फोडाफोडीची आम्हाला काही भीती नाही. उलट विरोधकांनीच त्यांच्याकडे असलेल्यांकडे लक्ष नाही दिले तर तेही संचालक आमच्याकडे आले तर नवल नाही.
आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीने कळमनुरी व औंढा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळले. काहींनी तर निवडणुकीनंतरही वादांची लड वाजविणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.