मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे महाविद्यालयांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:32+5:302021-06-29T04:20:32+5:30
हिंगोली : कोरोनामुळे विद्यार्थी गावाकडेच अडकून पडल्याने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे ९१६ अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्जाच्या ...
हिंगोली : कोरोनामुळे विद्यार्थी गावाकडेच अडकून पडल्याने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे ९१६ अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्जाच्या त्रुटी दूर करण्यासाठी महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोना काळात हे अर्ज निकाली काढण्याचे आव्हान महाविद्यालयांना पार पाडावे लागणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने एससी व व्हीजेएनटी प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पार पडते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यास सुरवात होते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. तरीही समाजकल्याण विभागाकडे एससी प्रवर्गातील ४ हजार ९८८ तर व्हीजेएनटी प्रवर्गातील ४ हजार ४६५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. मात्र कोरोनामुळे विद्यार्थी गावी अडकल्याने अर्जातील त्रुटी दूर करताना महाविद्यालयांची चांगलीच दमछाक होत आहे. महाविद्यालयांकडे अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यास वेळ लागत आहे.
विद्यार्थी गावी अडकले
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज केला असून तो अर्ज महाविद्यालयाकडे सुपुर्द केला आहे. अर्जात त्रुटी असल्याची माहिती महाविद्यालयाकडून मिळाली होती. त्यानुसार महाविद्यालयात जाऊन त्रुटीची पूर्तता केली. आता शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.
- शंकर मुलगीर
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असून सर्व कागदपत्रे व्यवस्थित दिली आहेत. अर्ज मंजूर झाला असून
शिष्यवृत्ती केव्हा जमा होते, याकडे लक्ष लागले आहे.
- मयूर बेणगर
परदेशातील शिक्षणासाठीच्या अर्जासाठी मुदतवाढ
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी दोन दिवस अर्ज करण्यासाठी मिळणार आहेत.
एससी प्रवर्ग अर्जाची स्थिती व्हीजेएनटी प्रवर्ग
४,९८८ किती अर्ज ऑनलाईन सादर केले ४,४६५
३,४७६ समाजकल्याण विभागाने किती निकाली काढले ३,३९१
६१३ महाविद्यालयात प्रलंबित अर्जांची संख्या ३०३