ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:27 AM2021-01-21T04:27:27+5:302021-01-21T04:27:27+5:30
सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून, या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काही ठिकाणी प्रस्थापितांनी ...
सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून, या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काही ठिकाणी प्रस्थापितांनी ग्रामपंचायतीवर पुन्हा ताबा मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. यामध्ये पंचायत समितीचे सभापतिपद असलेल्या चुंचा येथील काँग्रेसप्रणीत गटाला मतदारांनी डावलले असून, विरोधकांनी ९ जागांवर विजय मिळवत परिवर्तन घडून आणले आहे. तर भोसी येथे शिवसेनाप्रणीत गजानन अवचार यांच्या पॅनलला धूळ दाखवत विजय अवचार यांच्या गटाने एकहाती विजय मिळविली आहे. भाटेगाव येथे माजी सरपंच शंकर आडे यांच्या संपूर्ण पॅनलला पराभूत करून संजय बहत्तरे व भालूसिंग राठोड यांच्या गटाने वर्चस्व मिळवून परिवर्तन घडवून आणले आहे.
दांडेगाव येथे माजी जि. प. सदस्य जगदेवराव साळुंके, विद्यमान जि. प. सदस्य कैलास साळुंके यांच्या काँग्रेसप्रणीत समता विकास पॅनलने पुन्हा एकदा पूर्ण ९ जागांवर एकहाती विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. यामध्ये मोठे प्रयत्न करूनदेखील विरोधी गटाला एकही जागा मिळवता आली नाही. त्याचप्रमाणे सालापूर, रामेश्वर तांडा, येडशी या ठिकाणी मागच्या वेळी ग्रामपंचायतच्या सत्तेत असणाऱ्यांनी पुन्हा विजय मिळवत सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.