काळे झेंडे दाखवल्यानंतरही सभेला जाणारच, भुजबळांचा निर्धार; आंबेडकरांच्या इशाऱ्यावर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 02:35 PM2023-11-26T14:35:53+5:302023-11-26T14:39:04+5:30

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्यावरही छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Chhagan Bhujbal reacts to Prakash Ambedkar warning over maratha obc reservation | काळे झेंडे दाखवल्यानंतरही सभेला जाणारच, भुजबळांचा निर्धार; आंबेडकरांच्या इशाऱ्यावर म्हणाले...

काळे झेंडे दाखवल्यानंतरही सभेला जाणारच, भुजबळांचा निर्धार; आंबेडकरांच्या इशाऱ्यावर म्हणाले...

हिंगोली - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला निघालेल्या छगन भुजबळ यांच्या ताफ्याला काही ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण हिंगोलीतील सभेला जाणार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

"काही ठिकाणी चार-पाच लोक होते. मात्र कुठेही माझा ताफा अडवण्यात आला नाही. माझा ताफा कुठे थांबला देखील नाही. या देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी सभेसाठी जाणार आहे," असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत घेतलेल्या संविधान सन्मान सभेतून टीका करणाऱ्या ओबीसी नेत्यांना इशारा दिला होता. यावरही भुजबळ यांनी आज भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचं आवाहन करताना भुजबळ म्हणाले की, "मी प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात एकही शब्द बोललेलो नाही. या अडचणीच्या काळात आम्हाला त्यांचे सहकार्य हवं आहे. आंबेडकर यांनी मंडल आयोग असेल किंवा इतरही अनेक वेळा आम्हाला मदत केली आहे. आताही ते आम्हाला मदत करतील. कारण कालच त्यांनी सांगितलं आहे की, मराठ्यांचं आणि ओबीसींचं ताट वेगळं हवं. म्हणजे मराठ्यांना ओबीसीत आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, अशी त्यांची भूमिका असल्याचा अर्थ आम्ही घेतो," असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवल्यानंतर त्यांना ओबीसी नेत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. या टीकाकारांना उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, " आरक्षणावरून वाद सुरू झालेला आहे. ओबीसीचे जे सध्याचे नेते आहेत त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नका. तुम्ही मंडलसोबत नव्हता तर कमंडलसोबत होता. जनता दलाबरोबर ओबीसी आरक्षण मिळवणारे आम्हीच होतो."

Web Title: Chhagan Bhujbal reacts to Prakash Ambedkar warning over maratha obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.