कृषी कार्यालयात बोकड, कोंबड्या, दारू अन् चकना; स्वाभिमानीचे अनोखे आंदोलन गाजले...
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: September 27, 2023 03:44 PM2023-09-27T15:44:28+5:302023-09-27T15:45:09+5:30
पार्टी घ्या, पण बोगस जैविक किटकनाशक कंपन्यांवर कारवाई करा
हिंगोली : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनो पार्टी घ्या पण बोगस जैविक किटकनाशक विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात २७ सप्टेंबर रोजी अनोखे आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पार्टी देण्यासाठी कोंबडी, बकरा, दारू ,सिगारेट सह चकणाही आणला होता.
जिल्ह्यात बोगस जैविक किटकनाशक व खते विक्री केली जात असल्याचा आरोप करीत या प्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नोटा उधळून या कार्यालयात आंदोलनही केले होते. त्यावेळी संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्याने दिले होते.मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याने बुधवारी आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दुपारी कृषी अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी सोबत कोंबडी, बकरा, दारु बॉटल, सिगारेट पाकीट, चकणाही आणला होता. अधिकाऱ्यांनो पार्टी घ्या पण कंपन्यांवर कारवाई करा अशी घोषणाबाजी करीत अधिकाऱ्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे कृषी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली होती.