आसना नदीतील बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 06:08 PM2019-04-04T18:08:15+5:302019-04-04T18:08:50+5:30
कृष्णा संतोष जाधव (१०) असे मृत बालकाचे नाव आहे.
वसमत ( हिंगोली ) : तालुक्यातील महागाव येथील आसना नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका बालकाचा गाळात फसल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली. कृष्णा संतोष जाधव (१०) असे मृत बालकाचे नाव आहे.
इसापूर धरणातून कुरूंदा भागातील कालव्याला सोडण्यात आलेले पाणी महागाव शिवारातील आसना नदीत येते. नदीवर पाणी जिरवण्यासाठी बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यात कालव्याचे पाणी दोन दिवसापासून देणे सुरू होते. पहिल्या दिवशी बंधाऱ्यात पाणी कमी असताना संतोष आपल्या लहान भावासोबत पोहण्यासाठी गेला होता. दुसऱ्या दिवशीही हे दोघे भाऊ पोहोण्यासाठी गेले. कृष्णाने पाण्यात उडी मारली मात्र बंधाऱ्यात पाणी पातळी वाढल्याचा त्याला अंदाज न आल्याने तो वर आलाच नाही. त्यामुळे सोबत असलेल्या त्याच्या लहान भावाने आरडाओरडा केली.
यानंतर घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थ दाखल झाले. पात्रात शोध घेतला असता तो तळाशी गाळात फसलेला आढळून आला. पाण्यातून वर काढल्यानंतर त्याला उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर घटनेचा पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरु आहे.