मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुलांना कारने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:08 PM2022-12-13T13:08:25+5:302022-12-13T13:09:09+5:30
अपघातानंतर कार न थांबता तेथून पुढे गेली असून पोलीस कारचा शोध घेत आहेत.
वारंगा फाटा ( हिंगोली) : वारंगाफाटा ते हदगांव मार्गांवर भुवनेश्वर, कुर्तडी येथे आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुलांना कारने जोरदार धडक दिली. यामध्ये एका १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वारंगा फाटा ते हदगांव या मार्गांवर आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथील आर्यन राजू चौरे (१४ ), रितेश धोंडिबाराव नरवाडे(१४ ), कोमल अशोक हरकरे (१८ ) आणि साक्षी मोतीपुरी पुरी(१८) हे चौघे रोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉक करत होते. अचानक हदगावकडून वारंग्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना उडवले. यामध्ये आर्यन राजू चौरे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच बिट जमादार शेख बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारसाठी रवाना केले. दरम्यान, कोमल अशोक हरकरे ही तरुणी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर कार न थांबता तेथून पुढे गेली. पोलीस कारचा शोध घेत आहेत. या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. वळण रस्ता किंवा अपघात स्थळ असे फलक महामार्गावर लावलेले नाहीत असे ग्रामस्थ श्याम नारवाडे यांनी सांगितले.