चिमुकल्यांचा सुटी मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:54+5:302021-07-11T04:20:54+5:30
हिंगोली : जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली असली तरी, अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे गत दीड वर्षापासून चिमुकले ...
हिंगोली : जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली असली तरी, अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे गत दीड वर्षापासून चिमुकले घरातच आहेत. आता तर चिमुकले अभ्यासाचे नाव काढले तरी, विविध कारणे सांगून अभ्यास टाळत आहेत. अद्याप त्यांच्यातील सुटीचा मूड अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.
कोरोनाकाळात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही दिवस सुरू ठेवण्यात आले होते. मात्र गत दीड वर्षापासून प्राथमिक शाळा बंदच आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. दिवसभर ऑनलाईन अभ्यास व त्यानंतर घरातच खेळणे यामुळे विद्यार्थी कंटाळले आहेत. सुरुवातीला ऑनलाईन अभ्यासाला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मात्र विविध कारणे सांगून अभ्यास करण्याचे टाळले जात आहे. त्यात रोजच्या सुटीमुळे शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेची आठवणही येत नसल्याचे दिसत आहे. आताही विद्यार्थ्यांमधील सुटीचा मूड कायम आहे.
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले जात नाही. शिक्षक मात्र नियमित ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून होमवर्क देत आहेत. पालक इतर कामांत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांवरील लक्ष कमी झाले आहे. पालकांनी काही तास मुलांसोबत घालविल्यास विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. यासाठी पालक शिक्षण विभागाच्या विविध शैक्षणिक ॲपच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास घेऊ शकतात. यातून विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कायम राहील.
पालकांची अडचण वेगळीच
लहान मुले ऑनलाईन अभ्यासाला कंटाळली आहेत. त्यात ग्रामीण भागात नेटवर्क राहत नाही. त्यात सध्या शेतीची कामे असल्याने पाल्याचा अभ्यास घेण्यास फारसा वेळ मिळत नाही. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल.
- विजय भोणे, नर्सी
ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रश्न असला तरी आम्ही पाल्याचा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र ऑनलाईन अभ्यासात मुलांचे लक्ष लागत नाही. पाल्य विविध कारणे सांगत आहे. शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
- प्रकाश खंदारे
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
- शिक्षण विभाग ऑनलाईन अभ्यास घेत असला तरी लहान मुले मात्र विविध कारणे सांगून अभ्यास करण्याचे टाळत आहेत.
- पुस्तके नाहीत, चांगला मोबाईल नाही, मोबाईलवरील अभ्यास समजत नाही, अशी कारणे ती सांगत आहेत.
- त्यात पालक अभ्यासाला सोबत बसल्यास पोटात दुखते, झोप येत आहे, भूक लागली अशी कारणे शोधत असल्याचे चित्र आहे.
- शाळा बंद व सारखे घरात राहत असल्याने अभ्यासाची सवयच मोडली असून, पालकांनी स्वत: पुढाकार घेऊन लहान मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे बनले आहे.