निसर्ग शाळेतील चिमुकल्यांचा चिवचिवाट पोहोचला गोवा राज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:51+5:302021-06-04T04:22:51+5:30
हिंगोली : उच्च ध्येय प्राप्त करत असतानाच मुले निरोगी आयुष्य कसे जगतील, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत ‘एक मूल, ...
हिंगोली : उच्च ध्येय प्राप्त करत असतानाच मुले निरोगी आयुष्य कसे जगतील, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत ‘एक मूल, तीस झाडे’ या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात निसर्गशाळा सुरू करण्यात आली असून, बघता बघता ती आता गोवा राज्यात पोहोचली आहे. परराज्यातील मुले निसर्गशाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.
मानवाच्या जीवनातील ढासळलेली नैसर्गिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असा संदेश ही निसर्गशाळा देेऊ पाहत आहे. गत दीड वर्षापासून एका अदृश्य विषाणूने मानवाला भयभीत करून सोडले आहे. परिस्थितीत सहनशीलता आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यापलीकडे आपल्याजवळ दुसरा मार्गच उरला नाही. मुलांना निसर्गाची ओढ लागावी म्हणून कवी अण्णा जगताप यांनी ‘निसर्गशाळा’ सुरू करून मुलांना निरोगी राहण्यासाठी एक वेगळी दिशा दिली आहे.
१ मे २०२१ रोजी निसर्गाच्या शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. आता बघता बघता ही निसर्गशाळा परराज्यात म्हणजे गोवा येथे पोहोचली आहे. एका महिन्यात निसर्गशाळेत ५२० जणांनी प्रवेश घेतला आहे. या निसर्गाच्या शाळेत १४ वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जातो. अगदी रांगत्या लेकरापासून मुले निसर्गाच्या शाळेत दाखल होऊन पालकांच्या मदतीने निसर्गाची शाळा शिकत आहेत.
निसर्गाची शाळा आठवड्यातील एक दिवस, एक घंटा चालत असते. बाकीचे दिवस मुलांना कृती करण्यासाठी वेळ दिला जातो. फक्त पुस्तकी ज्ञानाचे प्रचंड ओझे पाठीवर वाहन्यापेक्षा मुलांचे मातीशी नाते जोडले जावे, हा निसर्गशाळेचा निखळ हेतू आहे, असे अण्णा जगताप यांनी सांगितले.
झाडे लावण्यापासून झाडांचे संगोपन कसे? करता येईल याची माहिती निसर्गशाळेत दिली जात आहे. महाराष्ट्रातील २५०च्या वर विद्यार्थ्यांनी घरच्या घरी फळझाडांची रोपवाटिका तयार करायला सुरुवात केली आहे. बी रुजवायचं कसे, बी उगवतं कसे, त्याला पाणी किती टाकायचे, ते वाढतं कसे, त्याचे जतन कसे? करायचे? रोप लावायचे कसे? याचे शिक्षण निसर्गशाळेत दिले जात आहे. महाराष्ट्रातील पालघर, मुंबई. नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, जालना, लातूर, अमरावती, वाशिम, नांदेड, यवतमाळ, बीड, नागपूर, हिंगोली, परभणी आदी २५ जिल्ह्यांतील ५२० मराठी भाषिक मुले निसर्गाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.
मुले आनंदी राहावीत हाच उद्देश
कोरोनाने जगणे कठीण करून सोडले आहे. शाळा तर दीड वर्षापासून बंदच आहेत. त्यामुळे मुलांना घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि मुले आनंदी राहावीत, हा निसर्गशाळेचा उद्देश आहे,
- अण्णा जगताप, ‘एक मूल, तीस झाडे’ अभियान प्रमुख