सिगरेटची तलफ बेतली जीवावर; तोल जाऊन पडल्याने एकजण कालव्यात वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 07:37 PM2021-02-09T19:37:03+5:302021-02-09T19:38:06+5:30
औंढा-जिंतूर महामार्गावरून जात असताना गोळेगाव येथे ते जेवण्यासाठी धाब्यावर उतरले.
औंढा नागनाथ : सिगारेट ओढण्याच्या नादामध्ये अचानक तोल गेल्याने कालव्यामध्ये पडून एकजण वाहून गेल्याची घटना सोमवारी रात्री ९.४५ वाजता गोळेगाव येथे घडली. पोलीस प्रशासन सध्या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील ज्ञानेश्वर उकंडराव डोके ( 40, नारळी, ता. उमरखेड ) हे आपल्या कुटुंबीयांसोबत औरंगाबाद येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होते. औंढा-जिंतूर महामार्गावरून जात असताना गोळेगाव येथे ते जेवण्यासाठी धाब्यावर उतरले. जेवण झाल्यानंतर डोके यांना सिगारेट पिण्याची तलफ झाली. बाजूच्या पानपट्टीवरुन सिगारेट घेऊन ओढत मागे गेले. मात्र मागे सिद्धेश्वर धरणाचा कालवा तुडुंब भरून वाहत होता. त्यांना याची माहिती नसल्याने ते तसेच पुढे गेले आणि तोल जाऊन कालव्यात पडले. पाण्याचा आवाज झाल्याने नातेवाईकांनी तिकडे धाव घेतली.
उपस्थितांनी लागलीच याची माहिती औंढा नागनाथ येथील पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना दिली. जमादार अफसर पठाण, इक्बाल शेख व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला. कॅनलला पाणी सुरू असल्याने मंगळवारी देखील या बेपत्ता व्यक्तीचा शोध अद्यापपर्यंत नव्हता. लघु सिंचन विभागाची कर्मचारीदेखील त्यांचा शोध घेत आहेत.