सिनेस्टाईल पाठलाग; तीन संशयित पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:52 AM2018-06-23T01:52:29+5:302018-06-23T01:52:32+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांनी वैतागलेल्या बाळापूर पोलिसांनी तीन संशयितांना पीकअप गाडीसह अटक केली आहे. मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास ५ कि.मी. गाडीने तुफान पाठलाग करून सिनेस्टाईलने तीन संशयितांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चोरीसाठी उपयुक्त वस्तूही सापडल्या. आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांनी वैतागलेल्या बाळापूर पोलिसांनी तीन संशयितांना पीकअप गाडीसह अटक केली आहे. मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास ५ कि.मी. गाडीने तुफान पाठलाग करून सिनेस्टाईलने तीन संशयितांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चोरीसाठी उपयुक्त वस्तूही सापडल्या. आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून हळद चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. तीन वेअर हाऊस व दोन शेतातील आखाड्यांवरून लाखो रूपये किमतीच्या हळदीची चोरी झाली. बाळापूर ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले. पण चोरांचा तपास लागत नव्हता. याचा शोध बाळापूर पोलीस घेत होते. पण यश मिळत नव्हते. २१ जून २०१८ रोजी रात्री १०.३० वा. च्या सुमारास पोनि व्यंकटेश केंद्रे यांना अर्धापूर भागात चोरट्यांच्या पाठीमागे काहीजण लागले. पण ते चारचाकी लोडिंग वाहनात बसून पसार झाल्याची खबर गुप्त खबऱ्याने दिली. यावेळी चालक व पोकाँ भालेराव यांना घेवून वारंगा- बाळापूर रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना दाती ते कुर्तडीदरम्यान एक पीकअप गाडी तुफान वेगाने पोलीस वाहनाला ओव्हरटेक करून गेली. वाहनाचा नंबर व वर्णन मिळते जुळते दिसले. मग तुफान वेगात त्या वाहनाचा पाठलाग करून बाळापूरच्या बसस्थानकाजवळ त्या वाहनाच्या पुढे पोलीस वाहन आडवे लावून थांबविले. किर्र काळोखात क्षणाचाही विलंब न करता ठाणेदार व एका कर्मचाºयाने तिघांना ठाण्यात आणले. तिघांची वेगवेगळी विचारपूस केली असता तिघांनीही वेगवेगळी उत्तरे दिली. पोलिसाचा संशय त्यामुळे अधिक बळावला. त्यांच्याजवळून लोखंडी हुक, आकडे, शटर उचकवण्यासाठीच्या बनवून घेतलेल्या टॉम्या, सबल असे साहित्य जप्त केले. सुनीलसिंग उर्फ सोनुसिंग गुलाबसिंग बावरी (२०), पंजाबसिंग धरमसिंग टाक (३२) दोघेही रा. इंदिरानगर, कळमनुरी व पिकअप गाडीचा चालक-मालक चंदनलाल सुरजलाल जैस्वाल (५६) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून पिकअप गाडी एम.एच. २९- एम. १३८१ व संशयिताचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांच्याकडे पुढील तपास आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती फौजदार तानाजी चेरले यांनी दिली.