पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी खबरदारी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:55+5:302021-09-27T04:31:55+5:30
हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे ओढे, नाले, नदीला पूर येत ...
हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे ओढे, नाले, नदीला पूर येत आहे. पुरामुळे जिवीत हानीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पूरस्थितीत खबरदारी घ्यावी, तसेच काही मदत लागल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.
जिल्ह्यात शनिवारी पुराच्या पाण्यामुळे तीन जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुराच्या पाण्यापासून दूर राहून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, पुराच्या पाण्यातून ये-जा करू नये, तसेच पुराच्या पाण्यातून वाहने नेऊ नयेत. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर राहणाऱ्या ग्रामस्थांनी सतर्क रहावे, नदी, ओढ्याच्या काठावर पीक, पशूधन असतील तर त्यांना तत्काळ उंच ठिकाणी हलवावे, धबधब्याच्या ठिकाणी आपण किंवा पाल्यांना जाण्यापासून प्रतिबंध करावा, घरातील विद्युत वायर कट झालेले नाहीत ना याची खात्री करावी, गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ जवळील पोलीस ठाण्याशी किंवा हिंगोली येथील पोलीस नियंत्रण कक्षातील ८६६९९००६७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.