जमीन तापत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये; तहसीलदारांनी काढले आदेश
By यशवंत भीमराव परांडकर | Published: July 8, 2023 11:43 AM2023-07-08T11:43:38+5:302023-07-08T11:44:38+5:30
‘लोकमत’ वृत्ताची दखल घेऊन लक्ष्मण नाईक तांडा परिसरात पथकाने केली पाहणी
- महेबूबखाँ पठाण
शिरड शहापूर (जि. हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथील माळारानावरील जमीन तापून त्यामधून धूर निघत आहे. ही बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच भूजल सर्वेक्षण विभाग व भूगर्भशास्त्र विभागाच्या पथकाने ७ जुलै रोजी लक्ष्मण नाईक तांडा येथे जाऊन पाहणी केली. या परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असे आदेश तहसीलदार हिमालय घोरपडे यांनी दिले आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा शिवारातील माळरानात एका लोखंडी खांबाजवळ दहा बाय दहा एवढ्या आकाराच्या जमिनीतून अचानक धूर निघत आहे. तसेच तेथील जमीन तापत आहे. त्यातून धूर निघत असल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तहसीलदार घोरपडे, रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागाच्या डॉ. कदम, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी रवींद्र मांजरमकर, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मंडळ अधिकारी सुरेश बोबडे, तलाठी एम. एफ. फोपसे, सरपंच ज्योती रवींद्र पवार, महावितरण वीज कंपनीचे सहायक अभियंता आश्विनकुमार मेश्राम, नितेश कुलकर्णी आदींनी लक्ष्मण नाईक तांडा येथे जाऊन पाहणी केली.
नागरिकांनी जमीन तापते तिथे जाऊ नये...
पथकाने घटनास्थळावरून काळे पडलेले दगडांचे नमुने तपासणीसाठी घेतले. हा प्रकार का घडत आहे? याची माहिती होईपर्यंत या परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असे आदेश तहसीलदार घोरपडे यांनी काढले आहेत, तसेच परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही तहसीलदार व पथकाने केले आहे.