संचारबंदीच्या नियमांना तिलांजली देत नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:24 AM2021-05-03T04:24:14+5:302021-05-03T04:24:14+5:30
हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत असताना नागरिक मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र हिंगोली शहरात ...
हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत असताना नागरिक मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र हिंगोली शहरात दिसत आहे. मुक्तपणे फिरण्यासाठी शहरातील बॅरिकेड तोडण्यापर्यंत मजल जात असून पोलीस कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ मेपर्यंत संचारबंदीचा निर्णय घेतला घेतला होता. त्यात पुन्हा १५ दिवसांची वाढ करण्यात आली. या काळात दूध व कृषी संबंधित दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी अनेकजण विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. पोलीस प्रशासन अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत असले तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. शहरातील गर्दी टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर लाकडी बॅरिकेड उभारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवरील गर्दी टळण्यास मदत झाली. मात्र काही नागरिक रस्त्यांवर लावलेले लाकडी बॅरिकेड तोडून मुक्त संचार करीत आहेत. तोडलेले बॅरिकेड पुन्हा उभारण्यामध्ये पोलिसांचा वेळ जात आहे. रविवारी तर शहरातील काही रस्त्यांवर हातगाडे मोठ्या संख्येने होते. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. शहरात होणारी गर्दी लक्षात घेता शहर पोलीस ठाण्याच्या वतीने २ मे रोजी रिसाला भागात वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आली. यामुळे काही प्रमाणात विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसण्यास मदत झाली. काही नागरिक तर मास्कही वापरत नसल्याने कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.