नागरिकांनी फिरविली लसीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:25+5:302021-06-18T04:21:25+5:30
हिंगोली : कोरोना प्रतिबंध लस टोचून घेण्यासाठी महिनाभरापूर्वी दिसणारी गर्दी सद्य:स्थितीत दिसून येत नाही. गुरुवारी कल्याण मंडपम् येथे ...
हिंगोली : कोरोना प्रतिबंध लस टोचून घेण्यासाठी महिनाभरापूर्वी दिसणारी गर्दी सद्य:स्थितीत दिसून येत नाही. गुरुवारी कल्याण मंडपम् येथे दुपारी १ वाजेच्या दरम्यान कर्मचारी वगळता दोनच नागरिक लसीकरण करताना दिसून आले. नागरिकांची आम्ही वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दिली.
कोरोना महामारी संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी येणाऱ्या तिसऱ्या लाटेची भीतीही नागरिकांना वाटत नाही. नागरिक लसीकरण का करून घेत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. लसीकरण केल्यास ताप येतो, अंग दुखते आदी चर्चा आजही नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. गत दोन महिन्यांपूर्वी शहरातील कल्याण मंडपम्, सरजूदेवी विद्यालय, माणिक स्मारक विद्यालय आदी केंद्रांवर लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लागायच्या. परंतु, आजमितीस दोन-चार नागरिकच लसीकरण करताना दिसून येत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ ठेवली आहे. १८ वर्षांवरील वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यास गर्दी वाढेल, अशी माहिती केंद्रावरून देण्यात आली.
आजपर्यंत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस १ लाख १६ हजार १५५ नागरिकांना तर दुसरा डोस ३५ हजार ४७१ जणांना दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे १ लाख ७९ हजार १०० तसेच कोव्हॅक्सिनचे ३६ हजार ६७० असे एकूण २ लाख १५ हजार ७७० डोस आलेले आहेत.
तिसरी लाट समोर ठेवून
लसीकरण करून घ्यावे
दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना महामारीचा धोका कायमच आहे. तिसरी लाट डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांनी लसीकरण वेळात वेळ काढून करून घ्यावे. लसीकरणाबाबत हयगय करू नये.
- प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
फोटो १४