बोगस कागदपत्रांवर विमा लाटणे वकील, पक्षकार अन् पोलिसाच्या अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:38 PM2022-10-20T12:38:21+5:302022-10-20T12:39:03+5:30
मोटार अपघात झाला नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे संगनमत करुन खोटे दावे दाखल केल्याचे उघड
हिंगोली : बोगस कागदपत्रांच्या आधारे विमा लाटला जात असल्याच्या संशयावरून परभणी जिल्ह्यातील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या चौकशीत यात तथ्य आढळून आल्याने परभणी व हिंगोली जिल्ह्यातील वकील, पक्षकार, पंच व पोलीस कर्मचारी अशा दहा जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल मोटार अपघात दावा क्र.३१०, ३११,३१२,४२७ / २०१६ मध्ये उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मोटार अपघात झाला नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे विम्याची रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी यातील आरोपींनी संगनमत करुन खोटे दावे न्यायालयात सादर केल्याचा संशय होता. या प्रकरणात गुन्हे अन्वेषण पथक हिंगोली मार्फत चौकशी झाली. तसेच परभणी जिल्ह्यातील चुडावा पोलीस ठाण्यात १८ रोजी विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला.
यात पूर्णा तालुक्यातील गौर येथील रोहिदास निवृत्तीराव जोगदंड व कैलास पंडितराव पारवे या दोन वकिलांसह पोलीस अंमलदार हरिभाऊ विश्वनाथ कदम यांच्यावरही गुन्हा नोंद झाला. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील गंगाधर नामदेवराव पारवे, एकनाथ दत्ताजीराव कऱ्हाळे, अनिरुद्ध बापूजी कऱ्हाळे, पूर्णा तालुक्यातील गौर येथील शिवराज गंगाधर जोगदंड, जनार्दन नारायणराव जोगदंड, नवनाथ तात्याराव जोगदंड, आहेरवाडी येथील भरत दादाराव मोरे हे सात जण दावा दाखल करणारे व पंच म्हणून साक्ष देणारे सात जण ही आरोपींच्या यादीत आहेत.
या दहा जणांना सीआयडीचे पोलीस अधीक्षक निकेश खाडमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अरविंद कांबळे, पोनि दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार चंद्रकांत पारटकर, दिनेश घुगे, चालक शिवाजी इंगोले, कुरेशी यांनी अटक केली.