सांडपाण्यावरून ग्रामसेवक आणि गावकऱ्यांत हाणामारी, सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील घटना
By यमेश शिवाजी वाबळे | Published: September 22, 2022 02:32 PM2022-09-22T14:32:09+5:302022-09-22T14:33:41+5:30
परस्परविरूद्ध फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
हिंगोली (रमेश वाबळे) : गावातील सांडपाणी व घरकुलाच्या कारणावरून सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे ग्रामसेवक व काही गावकऱ्यात हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी २२ सप्टेंबर रोजी परस्परविरूद्ध फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील गोरेगाव मार्गावरील दैाडाच्या पाटाजवळ सांडपाणी व घरकुलाच्या कारणावरून ग्रामसेवक भुजंग सोनकांबळे यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार सुनील दत्तराव इंगोले यांनी पोलीस ठाण्यात दिली. यामध्ये सुनील यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ग्रामसेवक सोनकांबळे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याच प्रकरणात ग्रामसेवक भुजंग शेषराव सोनकांबळे यांनी तक्रार दिली आहे. यामध्ये सोनकांबळे हे २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ग्रामपंचायतमधील कामकाज आटोपून दुचाकी वाहनावर घराकडे निघाले असता कडोळी ते गोरेगाव मार्गावर दौडाच्या पाटा जवळ गावातील सुनील दत्तराव इंगोले, नागेश दत्तराव इंगोले, किसन बंडू इंगोले, गजानन तुळशीराम इंगोले, राजू तुळशीराम इंगोले, रवींद्र उर्फ दलीत चोखाजी जाधव, सोनु दत्तराव इंगोले, अनिल दत्तराव इंगोले व इतर पाच जणांनी त्यांची दुचाकी अडवली. गोरेगाव पोलीस ठाण्यात १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केलेला गुन्हा मागे घे तसेच घरकुलाचा अहवाल दे या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत ग्रामसेवक सोनकांबळे यांच्या पाठीला दुखापत झाली. या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार मैदकर, गजानन बेडगे करीत आहेत.