स्वच्छतेतून हिंगोली पालिका सुंदरतेकडेे; सलग पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:40+5:302021-06-06T04:22:40+5:30

हिंगोली पालिकेला स्वच्छता अभियानात यापूर्वी तीनदा पुरस्कार मिळाला. दोनदा प्रोत्साहनपर पुरस्कारात रकमेचाही समावेश होता. स्वच्छता अभियानात २०१८ मध्ये पश्चिम ...

From cleanliness to Hingoli Palika beauty; Consecutive awards | स्वच्छतेतून हिंगोली पालिका सुंदरतेकडेे; सलग पुरस्कार

स्वच्छतेतून हिंगोली पालिका सुंदरतेकडेे; सलग पुरस्कार

Next

हिंगोली पालिकेला स्वच्छता अभियानात यापूर्वी तीनदा पुरस्कार मिळाला. दोनदा प्रोत्साहनपर पुरस्कारात रकमेचाही समावेश होता. स्वच्छता अभियानात २०१८ मध्ये पश्चिम विभागात ३८ तर २०१९ मध्ये ३३ वा क्रमांक आला. यात ७.५ कोटींची बक्षिसे मिळाली. त्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद या उपक्रमात ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या नगरपालिकांमध्ये हिंगोली पालिका देशात प्रथम आली होती. त्याचबरोबर चांगल्या दर्जाच्या घरकूल उभारणीसाठी तीन लाभार्थ्यांचा देशपातळीवर गौरव झाला होता. पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे हे सहकाऱ्यांना घेऊन राबवत असलेल्या विविध उपक्रमांना साथ दिल्याने पालिका माझी वसुंधरा उपक्रमातही राज्यात पहिली आली आहे.

कसे मिळाले यश?

माझी वसुंधरा अभियानात राज्यात पहिला येण्याचा मान मिळालेल्या हिंगोली पालिकेला एवढे मोठे यश मिळेल, याचा अंदाज नव्हता. हिंगोली पालिकेने पृथ्वी, जल, वायू, आकाश आदी पाच घटकांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार मिळाला. यात मागील काही वर्षांपासून काम सुरू होते. केलेल्या कामाचे ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. त्यातून निवड झाली.

नेमके काय केले?

हिंगोली पालिकेने वृक्षलागवडीवर भर दिला. शहरात पंधरा हजार रोपे गतवर्षी लावली, तर १५ हजार रोपट्यांची स्वत:ची नर्सरी उभी केली. यंदा २२ हजार वृक्षलागवड करण्यात येत आहेत.

नगरपालिकेने भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून गटाराचे पाणी थेट नदीत जाण्याचा प्रकार बंद केला. मलनिस्सारण प्रकल्प उभारून त्याद्वारे शुद्ध पाणी पात्रात सोडणार आहेत.

शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी नवीन बांधकामांसह जुन्यांनाही प्राेत्साहन दिले. त्यामुळे भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अद्ययावत केली. तेथे ओला कचरा वेगळा करून गांडूळ व सेंद्रिय खतनिर्मिती, टाकाऊ अनेक वस्तूंचा पुनर्वापर करण्यासाठी कचरा वेगळा करण्यात येत आहे.

त्याचबरोबर कचरासाठा बंद केल्याने वायुप्रदूषण घटले असून वृक्षलागवडीनेही याला हातभार लावला आहे.

माझी वसुंधरा अभियानासाठी पदाधिकाऱ्यांसह पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली आहे. हा पुरस्कार मिळाल्याचा अत्यानंद झाला. मागील काही वर्षांत पालिकेला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामुळे नागरिकांचेही सहकार्य चांगले मिळत आहे.

- बाबाराव बांगर, नगराध्यक्ष

माझी वसुंधरा अभियानातील पुरस्कार हा हिंगोली पालिकेच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा आहे. न.प.चे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने हे यश मिळाले. शहरवासीयांचे यासाठी अभिनंदन.

- दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष

पदाधिकाऱ्यांच्या साथीने न.प.तील माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत, प्रशासनातील वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि विविध कामांसाठी मिळालेली मदत उपयोगी ठरली. नागरिकांनीही सहकार्य केले. आपले शहर, हरित व सुंदर बनविण्यासाठी ऊर्जा देणारा हा पुरस्कार आहे.

डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी

Web Title: From cleanliness to Hingoli Palika beauty; Consecutive awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.