दुचाकी-कंटेनर अपघातात कळमनुरी न्यायालयातील क्लर्क जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:20 PM2020-10-31T12:20:37+5:302020-10-31T12:22:38+5:30
नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा शिवारात झाला अपघात
आखाडा बाळापूर : नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा शिवारात सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले. यात दुचाकीस्वार प्रमोद पवार हे जागीच ठार झाले. पवार कळमनुरी न्यायालयात ज्युनिअर क्लर्क म्हणून कार्यरत होते.
प्रमोद पवार हे मुळचे वसमत येथील रहिवासी होते. त्यांची नुकतीच वसमत न्यायालयातून कळमनुरी न्यायालयात बदली झाली होती. शुक्रवारी सार्वजनिक सुटी असल्याने पवार कळमनुरी येथून वसमतला आले होते. आज पुन्हा न्यायालयात रुजू होण्यासाठी ते सकाळीच आपल्या घरून निघाले होते. सकाळी १० वाजेच्या दरम्यान नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा शिवारात त्यांना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून पवार यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती सहा.पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली आहे.