वातावरण बदलामुळे अनेकांच्या आरोग्यात बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:25 AM2021-01-15T04:25:04+5:302021-01-15T04:25:04+5:30
नाल्यांवर ढापा बसविण्याची मागणी नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गावातील काही नाल्यांवर ढापा नसल्याचे दिसत आहे. ...
नाल्यांवर ढापा बसविण्याची मागणी
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गावातील काही नाल्यांवर ढापा नसल्याचे दिसत आहे. या नाल्यांवर ढापा नसल्याने अनेकदा ग्रामस्थांसह लहान बालकांचे पाय नालीत पडत आहे, तसेच रात्रीच्या वेळी अनेक वाहनेही नालीत घुसत आहेत. यामुळे गावकऱ्यांना या गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. यासाठी गावातील नाल्यांवर ढापा बसविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
वंजारवाडा भागातील वीजपुरवठा खंडित
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावाच्या वंजारवाडा भागातील वीजपुरवठा या ना त्या कारणाने वारंवार खंडित होत असतो. आता संक्रांतीसारखा सणही गावकऱ्यांना अंधारातच साजरा करावा लागला आहे. यासाठी संबंधितांनी लक्ष देऊन या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
बासंबा फाटा-गावापर्यंतच्या रस्त्याचे काम होईना
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा फाटा- गावापर्यंतच्या रस्त्याचे काम अद्यापही झालेले नाही. यामुळे गावात येणाऱ्या व गावातून जाणाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठा त्रास होत आहे. गावापासून ते फाट्यापर्यंतच्या रस्त्याची मागणी अनेकदा करण्यात येऊनही हा रस्ता कधी होणार, याकडे गावकरी लक्ष ठेवून आहेत.
रस्त्यावर खड्डेच खड्डे
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावाजवळ असलेल्या लिंबाळा मक्ता भागातील एमआयडीसी परिसरातील सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या भागातील उद्योगांकडे येणाऱ्या वाहनधारकांना आपले वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला
फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारात वन्यप्राणी घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या शेतशिवारातील गहू व हरभरा पीक बहरले असून, या पिकांवर ताव मारून पिकांचे मोठे नुकसानही वन्यप्राणी करीत आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
सांडपाणी रस्त्यावर साचले
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील वाॅर्ड क्रमांक १ आणि ३ मध्ये दुरवस्था वाढली आहे. या भागातील रस्त्यावर अनेकांच्या घरातील सांडपाणी जमा होत असल्याने या वाॅर्डात घाणीचे वातावरण पसरले आहे, तसेच या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. यासाठी या भागात नालीची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
नवीन वसाहतीतील रस्त्यांची दुर्दशा
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील नवीन वसाहतीमधील रस्त्यांची मागील अनेक महिन्यांपासून दुर्दशा झाली आहे. या भागातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी अनेकदा नागरिकांनी केली आहे; पण या मागणीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने सध्या या भागातील रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत.
मजुरांचे स्थलांतर वाढले
औंढा नागनाथ : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे अनेकांच्या हाताला अद्यापही काम मिळत नाही. शहरात व तालुक्यात रोजगार कमी असल्याने अनेक मजूर कामाच्या शोधात औरंगाबाद, मुंबई, ठाणे, कल्याणसह सुरत, गुजरात या अन्य राज्यांतही जात आहेत.