गर्मी वाढली, कोब्राने घेतला स्पिंकलर सेटचा आश्रय; शेतकऱ्याची उडाली घाबरगुंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:11 PM2023-08-16T12:11:09+5:302023-08-16T12:12:25+5:30
पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. उगवलेली पिके वाळून जाऊ नयेत म्हणून शेतकऱ्याने पिकांना पाणी देण्यासाठी घरातील स्प्रिंकलर बाहेर काढले.
- बापूराव इंगोले
नर्सी नामदेव (जि. हिंगोली) : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी पिके सुकून जाऊ नयेत म्हणून स्पिंकलरने खरीप पिकांना पाणी देऊ लागले आहेत. इडोळी येथील शेतकऱ्याने पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर बाहेर काढले, तेव्हा त्या शेतकऱ्याला ५ ते ६ फुटांच्या कोब्रा सापाचे दर्शन झाले. यामुळे शेतकऱ्याची घाबरगुंडी उडाली.
गत महिन्यात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर घरात ठेवून दिले होते. गत पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने चक्क पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतीत झाला आहे. पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. उगवलेली पिके वाळून जाऊ नयेत म्हणून इडोळी येथील शेतकरी हनुमान आनंदा टेकाळे यांनी १३ ऑगस्ट रोजी घरातील स्प्रिंकलरने पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर काढले. हे उचलतेवेळी जड लागू लागले म्हणून खाली ठेवले. त्याचवेळी कोब्रा सापाने शेतकऱ्याला फणा काढून दर्शन दिले. हा साप वजनाने ४ ते ५ किलोचा असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. शेतात कोब्रा साप निघाल्याची माहिती मिळताच प्रकाश टेकाळे यांनी सर्पमित्र सारंगधर जाधव, बंडू टेकाळे यांना माहिती दिली. सर्पमित्रांनी लगेच शेत गाठून कोब्रा सापाला पकडून जंगलात नेऊन सोडले.
गर्मी सहन न झाल्याने बसला स्पिंकलरमध्ये
पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दुसरीकडे वातावरणात दमटपणा निर्माण झाला आहे. दमट वातावरण कोब्रा सापाला सहन झाले नाही म्हणून तो थंड हवेेचे ठिकाण पाहून स्प्रिंकलरमध्ये बसला होता. कोणी मारणार असेल तर तो लगेच ओळखून हल्ला करतो, असे सर्पमित्र मुरली कल्याणकर व सचिन पाटील यांनी सांगितले.