शिरडमध्ये ‘कोचा’ची बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:14 AM2018-04-08T00:14:56+5:302018-04-08T00:14:56+5:30
मराठवाड्यातील हळदीच्या कोच्याची (सडून वाळलेली हळद) एकमेव बाजारपेठ शिरडशहापूरात उदयास आली आहे.
महेबुब पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : मराठवाड्यातील हळदीच्या कोच्याची (सडून वाळलेली हळद) एकमेव बाजारपेठ शिरडशहापूरात उदयास आली आहे. अलीकडच्या काही वर्षात दररोज १०० क्विंटल कोचा बंडाची खरेदी विक्रितून शिरडशहापूर व परिसरातील ग्रामस्थांबरोबर बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले.
सडून गेलेल्या हळदीच्या टाकावू कोचाच्या या बाजारपेठेमुळे ४-५ महिने सर्वांचा फायदा होत असल्याने शिरडशहापूर येथे कोचा खरेदीची मात्र सर्वत्र गर्दी दिसत आहे. मराठवाड्यात शिरडशहापूर येथे हळदीच्या कोच्याची एकमेव बाजारपेठ आहे. आजघडीला मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ व इतर जिल्ह्यातून दररोज १०० ते १५० क्विंटल कोचा येथे विक्रीसाठी येतो. दररोज ५० ते ६० लाख रुपयाची खरेदी विक्री होत आहे. नव्याने उदयास आलेल्या या बाजारपेठेमुळे परिसरातील ग्रामस्थांना ४-५ महिन्यासाठी रोजगार मिळाला आहे. शिरडशहापूर मधील जवळपास २०० सुशिक्षित बेरोजगार युवक व छोटेमोठे व्यापारी सकाळी ६ वाजता दुचाकी घेवून खेड्यापाड्यात कोच्या घेण्यासाठी जातात व जामा झालेला कोचा व्यापाऱ्यांना विकतात. ४-५ वर्षापासून बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. व्यापारी राज्यातील एकाही बाजारपेठेत कोचा न पाठवता थेट बाहेर राज्यात किंमत चांगली मिळत असल्याने तेथे विक्रीसाठी पाठवितात. आंतरराज्यीय बाजारपेठेत जुन्या हळदीच्या कोच्याला सोन्यासारखा भाव मिळतो. औषधी गुणधर्म असलेल्या या कोच्यास कांडीस १० ते १२ तर बंड्यास १३ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतो.
दहा- पंधरा वर्षापूर्वी फक्त खुर्शिदखॉ पठाण एकटे हा व्यवसाय करीत होते. आता आसाराम साखरे, अनिल सूर्यतळ, सुनील, स्वामी, शे. अफसर, शकील सेठ, सुभाष सूर्यतळ अनेक जण व्यवसायात उतरले आहेत.