दिलासादायक ! २२ नळयोजनांच्या निविदेला हिरवा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 07:27 PM2020-11-19T19:27:28+5:302020-11-19T19:29:24+5:30

हिंगोली जिल्हा परिषदेच्या जवळपास १८० गावांच्या नळयोजनांच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे.

Comfortable! Green flag for tender of 22 pipelines in Hingoli | दिलासादायक ! २२ नळयोजनांच्या निविदेला हिरवा झेंडा

दिलासादायक ! २२ नळयोजनांच्या निविदेला हिरवा झेंडा

Next
ठळक मुद्देशासन निर्णयाचा अडसर नाही

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध कामे करण्यास मनाई केली असल्याने यामध्ये पाणीपुरवठा योजनांचीही कामे अडकली होती. मात्र शासनाचा हा निर्णय या योजनांसाठी लागू आहे किंवा नाही, याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यास हिरवा झेंडा दाखविल्याने दिलासा मिळाला आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेच्या जवळपास १८० गावांच्या नळयोजनांच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. मात्र या गावांचे सर्व्हेक्षण करून त्या गावाची लोकसंख्या, पुढील २५ वर्षांतील या गावाची दरडाेई ४० लिटरप्रमाणे पाण्याची गरज आदी बाबींचा विचार करून त्या योग्य जलस्त्रोत निर्माण करून या योजना राबवायच्या होत्या. मात्र ही कामे करण्यासाठी या विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळत नसल्याने अडचणींचा डोंगर समोर उभा राहात आहे. तरीही तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी जवळपास तीस ते चाळीस गावांचे सर्व्हेक्षण करून त्या ठिकाणची अंदाजपत्रके तयार केली होती.

त्यानंतर जवळपास २२ गावांतील योजनांची कामे अंदाजपत्रके सादर झाल्याने शासनाकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्याने त्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी सज्ज होती. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर टाळेबंदी जाहीर झाली होती. तर ४ मे रोजी शसनाने सर्व विभागांना पत्र देवून नवीन कामे हाती घेवू नये, असे म्हटले होते. त्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर काही कामांची निविदाही काढण्यात आली होती. त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या कामांचे आता करायचे काय? निविदा उघडायच्या की नाही, यावरून पाणीपुरवठा विभागही द्विधा मन:स्थितीत होता. तर काहींची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ही कामे ठप्प करण्याची वेळ आली होती. त्यामुळे या कामांबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. कक्ष अधिकारी रवींद्र भराटे यांनी या योजनांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली असल्याने ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश द्यावेत, असे सांगितले. तसेच सुधारित कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्यास सांगितले आहे.

या आहेत त्या २२ योजना
हिंगोली जिल्ह्यात मंजूर झालेल्या २२ योजनांमध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा १.१७ कोटी, दौडगाव ५१.५८ लाख, जामगव्हाण ४४.३० लाख, लक्ष्मणनाईक तांडा १८.२६ लाख, रुपूर कॅम्प १३.८८ लाख, संघानाईक तांडा २.४५ कोटी, संतूक पिंपरी ६७.५२ लाख, सेंदूरसना ६९.६२ लाख, उखळी ७३.७९ लाख, वसमत तालुक्यातील दारेफळ ६७.६० लाख, धामणगाव ७६.४० लाख, नहाद ६८.७४ लाख, पांगरा सती ४६.३७ लाख, रिधोरा ५९.५३ लाख, सेनगाव तालुक्यातील हाताळा ७६.२८ लाख, हिवरा बेल २४.६८ लाख, माहेरखेडा ५२.११ लाख, शेगाव खोडके ७०.१० लाख, उटी ब्रह्मचारी ८१.०५ लाख, कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा ३८.१० लाख, रुद्रवाडी ६२.८३ लाख या योजनांचा समावेश आहे.

सर्व कामांना हिरवा झेंडा 
या मंजूर असलेल्या कामांपैकी काही कामे तांत्रिक लिफाफे उघडण्याच्या प्रक्रियेत होती. तर काही कामे आर्थिक लिफाफे उघडण्याच्या प्रक्रियेत होती. याशिवाय काही कामे ही कार्यारंभ आदेश देण्याच्या प्रक्रियेत होती. तर काही कामांची नेमकीच निविदा प्रक्रिया सुरू झालेली होती. मात्र आता या सर्व कामांना हिरवा झेंडा मिळाला आहे.

Web Title: Comfortable! Green flag for tender of 22 pipelines in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.