दिलासादायक ! हिंगोलीतून लांब पल्ल्यावरील बससेवा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 04:44 PM2020-10-27T16:44:52+5:302020-10-27T16:45:38+5:30
लांब पल्ल्यावरील बससेवा सुरू केल्याने प्रवाशांतून समाधान
हिंगोली : ऐन सणासूदीत प्रवाशांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे लांब पल्ल्यावरील बससेवा सुरू केली आहे. १८ सप्टेंबरपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली असून प्रवाशांतूनही माेठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे दीपावली व ईद सणानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळातर्फे लांब पल्ल्यावरील बस सुरू करण्यात आल्या आहेत.
सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाहतूक सेवा ठप्प हाेती, त्यात राज्य परिवहन महामंडळाची बससेवाही बंद असल्यामुळे प्रवाशांचे माेठे हाल झाले. परंतु आता शासनाकडून टप्याटप्याने शिथिलता दिली जात असून बससेवा सुरू केल्याने प्रवाशांची गैरसाेय दूर झाली आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे आता ऐन सणासुदीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता लांब पल्ल्यावरील बस सुरू केल्या आहेत, अशी माहिती परभणी येथील रा. प. विभाग नियंत्रक यांनी दिली.
अशा धावतील लांब पल्ल्यावरील बसेस...
सणासुदीत हिंगाेली आगारातून लांब पल्ल्यावरील बसेस धावणार आहेत. यामध्ये हिंगाेली-मुबंई मार्गे परभणी, पाथरी, माजलगाव, शेवगाव, अहमदनगर, चाकण ही लांब पल्ल्याची बससेवा हिंगाेली बसस्थानकातून दरराेज दुपारी ३ वाजता सुरू करण्यात आली असून, परभणी बसस्थानकावरून सुटण्याची वेळ सायंकाळी ५.१५ वाजता, व पाथरी बसस्थानकावरून सुटण्याची वेळ सायंकाळी ६.३० वाजता आहे. मुंबई येथून परत सुटण्याची वेळ सायंकाळी ६ वाजता आहे. तसेच इतर मध्यम लांब पल्ल्यावरील बससेवा प्रवाशांच्या साेयीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
हिंगाेली-मुंबई मार्गे परभणी, पाथरी दुपारी ३ वाजता तसेच हिंगोली-वर्धा सकाळी ६.१५, हिंगोली-कंधार सकाळी ८ वाजता मार्गे पूर्णा-चुडावा-पांगरी, जिंतुर-कंधार ८.३० वा. पूर्णा, चुडावा मार्गे तसेच हिंगोली-वाशिम दुपारी १ वाजता, हिंगोली-रिसोड मार्गे सेनगाव-पुसेगाव सकाळी ७ वाजता, पाथरी-औरंगाबाद सकाळी ९.३० वाजता मार्गे परतुर, परभणी-नांदेड मार्गे पूर्णा, लिंबगाव, चुडावा, सकाळी ७.३०, ८.३०, दुपारी १ वाजता २.३०, परभणी-औरंगाबाद सकाळी ६, ७, ८ दुपारी १२.३०, सायंकाळी ५.३० तसेच जिंतूर-यवतमाळ सकाळी ६ वाजता तसेच जिंतूर-वाशिम सकाळी ६.३० वाजता, परभणी-रिसोड सकाळी ६.३०, ८.१०, ११ तसेच दुपारी १ वाजता तसेच गंगखेड-औरंगाबाद मार्गे सिरसाळा सकाळी ७.३० वाजता या प्रमाणे बसफेऱ्यामध्ये वाढ केल्याची माहिती विभाग नियंत्रक मु.सु.जोशी यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळातर्फे सणासुदीत बससेवा सुरू केल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतू रात्रीच्या सुमारास वाशिम मार्गे बस सुविधा सुरू करावी अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे. आता शासकीय कार्यालय तसेच इतर कामकाजाकरिता वाशिम ते हिंगोली यासह इतर मार्गावरूनही हिंगोलीत येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या मार्गावरही बससेवा सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.