हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीने उर्वरित पेरण्यांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:51 AM2020-06-17T10:51:18+5:302020-06-17T10:51:59+5:30
मागील तीन ते चार दिवस सलग पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भागात पेरण्या करता येत नव्हत्या.
हिंगोली : जिल्ह्यात यंदा सलग झालेल्या पावसामुळे काही भागात जमिनीचा वाफसा नसल्याने रखडलेल्या पेरण्या काल पडलेल्या कडक उन्हामुळे आज सुरू झाल्याचे दिसत आहे.
हिंगोली यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपण्याची घाई सुरू केली होती मात्र मागील तीन ते चार दिवस सलग पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भागात पेरण्या करता येत नव्हत्या. काल दिवसभर कडक ऊन पडले होते. त्यामुळे आज सकाळी विविध भागात पेरण्या सुरू झाल्या आहेत. जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आज ही गती वाढणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले पर्जन्यमान झाले आहे. गतवर्षी 1 ते 17 जून या काळात अवघा 16 मी मी पाऊस पडला होता यंदा 110 मी मी पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 12.73 टक्के एवढा आहे जिल्ह्यात वार्षिक सरासरी 860 मिमी पावसाची नोंद होत असते मागील वर्षी पावसाळ्यात 892 मी मी पावसाची नोंद झाली होती मात्र सर्वाधिक पाऊस हंगाम काढणीच्या काळात झाला होता.