भाववाढीने तूर लावणारे मालामाल, तर सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच
By रमेश वाबळे | Published: February 1, 2024 06:11 PM2024-02-01T18:11:42+5:302024-02-01T18:12:00+5:30
यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली.
हिंगोली : येथील मोंढ्यात तुरीने १० हजार ६०० रुपयांचा पल्ला पार केला असून, काही दिवसांत अकरा हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनच्या भावात मात्र घसरण सुरूच आहे. १ फेब्रुवारी रोजी सोयाबीनला सरासरी केवळ ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.
यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. परंतु, यंदा उत्पादनात घट झाली. त्यामुळे भाव तरी समाधानकारक मिळेल, अशी आशा होती. किमान सहा हजार रुपयांचा भाव अपेक्षित असताना सोयाबीनने पाच हजारांचाही पल्ला गाठला नाही. डिसेंबरमध्ये ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० दरम्यान भाव मिळत होता. भाव वाढतील, अशी अशा असताना घसरण झाली. मागील पंधरवड्यापासून सोयाबीनचे भाव गडगडले असून, १ फेब्रुवारी रोजी सरासरी केवळ ४ हजार २०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत होती.
तर तुरीला सध्या समाधानकारक भाव मिळत असला तरी यंदा उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. ज्या काही शेतकऱ्यांकडे तूर आहे, ते विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, मोंढ्यात अपेक्षित आवक होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी मोंढ्यात दररोज किमान ५०० ते ६०० क्विंटल तूर विक्रीसाठी येते. यंदा मात्र ३०० क्विंटलवर आवक होत नसल्याचे चित्र आहे. सध्या मोंढ्यात तुरीला ९ हजार ९०० ते १० हजार ६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. भाव समाधानकारक असला तरी उत्पादन घटल्याने विक्रीसाठी तूर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गव्हाची आवक मंदावली...
नवीन गहू येण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे जो काही गहू शिल्लक आहे. तो विक्रीसाठी येत आहे. परंतु, आवक मंदावली असून, गुरुवारी जवळपास ६० क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. १ हजार ६०० ते ३ हजार १५५ रुपये भाव मिळाला.
हळद वधारली...
ऑक्टोबरपासून घसरलेले हळदीचे भाव मागील चार दिवसांपासून वधारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान ११ हजारांपर्यंत भाव घसरले होते. जानेवारीअखेर भावात वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी एक हजार क्विंटलची आवक झाली होती. ११ हजार ५०० ते १४ हजार १०० रुपये भाव मिळाला. हळदीचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हरभऱ्याला मिळाला ५५०० चा भाव...
येथील मोंढ्यात हरभऱ्याची आवक अत्यल्प आहे. त्यामुळे भावात किंचित वाढ झाली असून, ४ हजार ७०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडे नवीन हरभरा येण्यासाठी किमान एक महिना लागणार आहे. नवीन हरभऱ्यालाही समाधानकारक भाव मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.