रेल्वेस्थानकाकडे फिरकेनात प्रवासी; प्लॅटफॉर्म तिकीटही होईना खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:54 AM2021-03-13T04:54:52+5:302021-03-13T04:54:52+5:30
हिंगोली : रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. तरीही मोठ्या रेल्वेस्थानकावर गर्दी होत ...
हिंगोली : रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. तरीही मोठ्या रेल्वेस्थानकावर गर्दी होत असल्याचे चित्र आहे. मात्र येथील रेल्वेस्थानकाकडे प्रवाशी फिरकत नसल्याचे चित्र आहे. प्लॅटफॉर्म तिकीटही कोणी खरेदी करीत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसह नातेवाईकही रेल्वे जाईपर्यंत थांबतात. यामुळे रेल्वेस्थानकावर गर्दी होत असल्याचे मोठ्या रेल्वे स्टेशनवर पहावयास मिळते. अनेकवेळा तर प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये वाढ केली. तब्बल ५० रुपये तिकीट केले आहे. तरीही मोठ्या रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. मात्र हिंगोली येथील रेल्वेस्थानकावरून सध्या केवळ दोनच रेल्वे धावत आहेत. त्यातही केवळ रिझर्व्हेशन करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येत असल्याने तिकीट घरही बंद आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करण्याचा प्रश्नच उरत नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सध्या रेल्वे स्थानकावर अनेक रिकामटेकडे तासन्तास बसत आहेत. हिंगोलीसारख्या रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढीची संकल्पना फोल ठरत आहे.
सध्या धावताहेत दोनच रेल्वे
अकोला ते पूर्णा मार्गावरील हिंगोली हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. रेल्वे जंक्शन नसले तरी प्रवाशांची संख्या लक्षात घेता यामार्गे १६ रेल्वे धावत होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या इंटरसिटी व जयपूर अशा दोनच रेल्वे धावत असल्याचे रेल्वेस्थानकातील अधिकाऱ्याने सांगितले.
मोजकेच प्रवाशी करताहेत प्रवास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या केवळ रिझर्व्हेशन केलेले प्रवाशीच रेल्वेस्थानकावर येत आहेत. अशा प्रवाशांची संख्याही बोटावर मोजण्याएवढीच आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटाला कोणी विचारेना
रेल्वेस्थानकावर थांबण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते. मात्र येथे प्रवाशीच येत नसल्याने तिकीटही कोणी खरेदी करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसभरात एकही प्लॅटफॉर्म तिकीट विक्री होत नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
अकोला ते पूर्णा मार्गावरून नियमित १६ रेल्वे धावतात. यात डेली, साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. मात्र सध्या कोरोनामुळे रेल्वेंची संख्या कमी केल्याने प्रवाशीही रेल्वेस्थानकाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानकावर शुकशुकाट जाणवत आहे.
- कैलास गायकवाड
हिंगोलीसारख्या रेल्वेस्थानकावर प्रवाशांची संख्या मोजकीच असते. त्यामुळे गर्दी होण्याचा प्रश्नच उरत नाही. सध्या तर तिकीटघरही बंद आहे. पूर्ण क्षमतेने रेल्वे सुरू झाल्यास प्लॅटफॉर्म तिकीट लावावे.
-गजानन बांगर
कोरोनामुळे पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या दोन रेल्वे सुरू आहेत, त्या गाड्यांना जनरल डब्बे जोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे केवळ रिझर्व्हेशन करणारे प्रवाशीच प्रवास करीत आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी झाली आहे. मोठ्या रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट संकल्पना यशस्वी ठरते.
- राजकुमार, उपस्टेशन अधीक्षक