हिंगोली जिल्हा रुग्णालयात रजांसाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:24 AM2018-01-18T00:24:56+5:302018-01-18T00:25:48+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्याचे नाव नाही. काही ठराविक डॉक्टरांच्या तापामुळे की काय येथे शल्यचिकित्सकांचा रक्तदाबच वाढत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पूर्णवेळची ही समस्या असताना आता प्रभारींवरही तीच वेळ येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्याचे नाव नाही. काही ठराविक डॉक्टरांच्या तापामुळे की काय येथे शल्यचिकित्सकांचा रक्तदाबच वाढत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पूर्णवेळची ही समस्या असताना आता प्रभारींवरही तीच वेळ येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. १00 खाटांच्या रुग्णालयावर तीनशे खाटांचा ताण आहे. कालचाच विचार केला तर २२0 रुग्ण दाखल झाले होते. १00 खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात त्यांना कसे सामावून घ्यायचे, हा डॉक्टरांसमोरचा प्रश्न आहे. काही वरिष्ठ डॉक्टर वेळेवर न येणे, मधूनच सेवा सोडून गायब होणे असे प्रकार करीत आहेत. तर आर्थिक कारभार तर पार ढेपाळले आहेत. प्रशासकीय बाजू अतिशय लंगडी असल्याने काही दिवसांनंतर या रुग्णालयाचा कारभार ठप्पच होतो की काय, अशी भीती आहे. अनेकांची देयके वर्षानुवर्षे रखडत आहेत. तर आर्थिक व्यवहारांच्या भीतीने डॉक्टर मंडळी या जिल्हा शल्यचिकित्सकांचा पदभार स्वीकारायला तयार नाहीत. त्याचा परिणाम म्हणून डॉ.आकाश कुलकर्णी हे आधी हृदयविकार व रक्तदाबाच्या त्रासामुळे रजेवर होते. आता ते वारंवार वाढीव रजा देत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यांचा पदभार डॉ.मंगेश टेहरे यांना दिला. तेही काल रक्तदाब व इतर त्रासामुळे नांदेडच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यांच्याकडेही अतिरिक्त पदभारच होता. आता जिल्हा शल्य चिकीत्सकांसह टेहरे यांचाही अतिरिक्तचा पदभार कुणाकडे द्यायचा हा पेच निर्माण झाला आहे. आरोग्य उपसंचालकांनी तीन ते चार डॉक्टरांना यासाठी आदेशित करून पाहिले. मात्र प्रत्येकाने कारणे पुढे करून यातून अंग काढून घेतले.
प्रशासकीय कामकाजाबाबत वारंवार ओरड होत असली तरीही त्यावर योग्य नियंत्रण ठेवणारा अधिकारीच जिल्हा रुग्णालयाला लाभत नाही. प्रशासकीय अधिकारीही वारंवार रजा वाढवून घेत आहेत. सुतवणे नामक लिपिकाने तर घोटाळाच करून ठेवल्याने गुन्हाही दाखल झाला आहे. आता आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, स्वच्छता, बाह्यसेवा देणारे डॉक्टर आदी अनेकांची देयके रखडली आहेत. त्यासाठी निधी नाही की अधिकाºयांनाच प्रशासकीय ज्ञान नाही, हे कळायला मार्ग नाही. मात्र भीतीपोटीच ही देयके काढली जात नाहीत. तर हा कारभार कुणी हातीही घ्यायला तयार नाही. प्रशासकीय नियंत्रण नसल्याने डॉक्टर व कर्मचा-यांची मनमानी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नियंत्रण ठेवणा-यांच्याच रजा वाढू लागल्याने काही ठराविक लोकांच्या भरवशावरच कारभार चालू आहे. तेही किती दिवस ते सुरळीत ठेवतील, हा प्रश्न आहे. यात लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालणे तितकेच महत्त्वाचे असून तेव्हाच नांदेड रेफरिंग थांबणार आहे.
आमदारांची भेट : असुविधेबद्दल संताप
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारींसह कधीकाळी या रुग्णालयात सेवा बजावलेले आ.डॉ.संतोष टारफे यांनाही तेथील दूरध्वनी बंद असल्याने व वरिष्ठ डॉक्टर प्रतिसाद देत नसल्याने रुग्णालयात जाऊन संताप व्यक्त करावा लागला. अतिजोखमीचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांनी काळजी घेतली पाहिजे. मी स्वत:डॉक्टर असल्याने असा अनुभव येता कामा नये. प्रसंगी अडचणच असेल तर रुग्णालयात येऊन सेवा करण्याची तयारी आहे. मात्र समस्या सांगितल्या पाहिजेत. प्रशासकीय अडचणींचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हाधिका-यांची भेट घेऊ, असे आ.टारफे म्हणाले.