शेतकऱ्यांच्या व्याज सवलतीची रक्कम परस्पर हडपल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:48+5:302021-07-02T04:20:48+5:30
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, सेनगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, पळशी येथे चालू थकबाकीदार सभासदांच्या खात्यावर सन २०१३ ...
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, सेनगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, पळशी येथे चालू थकबाकीदार सभासदांच्या खात्यावर सन २०१३ ते १६ या कालावधीत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत येणारी ३ टक्के रक्कम जमा झालेली नाही. याप्रकरणी सभासदांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. या शेतकऱ्यांची ही रक्कम उचलून मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मध्यवर्ती बँकेच्या पळशी शाखेंतर्गत येणाऱ्या सर्व सोसायट्यांचे चालू खाते आहे. ज्या सोसायट्या बँक स्तरावर १०० टक्के बेबाकी होतात. त्या सोसायटीच्या चालू खात्यावर आलेली वसुली जमा होते. तथापि, मागील ७ ते ८ वर्षांपासून अशा जमा रकमा सहकार खात्याची कुठलीही परवानगी न घेता परस्पर काढण्यात आल्या आहेत. या प्रकरणात रवींद्र रावजी देशमुख हा कर्मचारी सूत्रधार असल्याचा आरोपही केला, तसेच चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत विचारले असता आ. तान्हाजी मुटकुळे म्हणाले, यात जवळपास ४६ लाखांचा अपहार झाल्याची शंका आहे. मात्र, बँकेचे पदाधिकारी व व्यवस्थापन या कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी चौकशीही करीत नसून, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी तारांकित प्रश्नही करणार असल्याचे ते म्हणाले.