समृद्ध महाराष्ट्रच्या ११६ विहिरी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:32 AM2018-09-28T00:32:34+5:302018-09-28T00:33:35+5:30
मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे.
हिंगोली जिल्ह्याला दहा हजार सिंचन विहिरींच्या कामांचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. यापैकी ९९७0 लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामसभेतून निवडले. ४0२२ जणांना प्रशासकीय मंजुरी दिली. तर २३९३ कामे चालू आहेत. यापैकी ११६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यात औंढा २0, हिंगोली-१५, कळमनुरी १३, सेनगावातील ६८ कामांचा समावेश आहे. वसमतमध्ये यातील एकही काम नाही. मग्रारोहयोत कामे करण्यास जशी पंचायत समित्यांची उदासीनता आहे, तशीच कामांचे नियमित अहवाल सादर करण्यासही उदासीनताच असल्याचे चित्र आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून वारंवार सूचना दिल्यानंतरही काहीच फरक पडत नाही. या योजनेतील कामे पूर्ण होत नसल्याची बोंब लोकप्रतिनिधी वारंवार करीत आहेत. मात्र तरीही याकडे लक्ष द्यायला पंचायत समित्यांना वेळ नसल्याचे दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून कामे सुरू असताना पहिल्यांदा ११६ सिंचन विहिरी पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. तर शेततळ्यांचे ५६00 एवढे उद्दिष्ट असून ग्रामसभेत अवघे ५३२ लाभार्थी निवडले. त्यापैकी ३२२ कामांना प्रशासकीय मान्यता दिली मात्र एकही सुरू झाले नाही.भू-संजिवनी व्हर्मी कंपोस्टिंगच्या कामांचे २२00 एवढे उद्दिष्ट आहे. यात ६८७ लाभार्थी ग्रामसभेतून निवडले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. ३ सुरू तर उर्वरित ठप्प आहेत. नाडेप कंपोस्टिंगमध्येही तेवढेच उद्दिष्ट असून मंजूर ७६८ पैकी १५ सुरू व २ पूर्ण झाली आहेत.
हिंगोली : मान्यतेनंतरही कामे सुरू होईनात
निर्मल शौचालयाचे २२६ प्रस्ताव मंजूर असून १२0 कामे सुरू आहेत. केवळ ८ पूर्ण झाले आहेत. शोषखड्ड्यांच्या ८८१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरीही ४८७ कामे सुरू झाली होती. यापैकी ५0 पूर्ण झाली आहेत. अंकुर रोपवाहिकेच्या ६१ कामांना मंजुरी दिली होती. यापैकी ५६ कामे सुरू असून
४ कामे पूर्ण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गाव तलावाचे तर एकही काम प्रस्तावित नाही. नंदनवन वृक्षलागवडीच्या योजनेत २३ कामांना मंजुरी दिली होती. १८ सुरू असून उर्वरित कामे अद्याप ठप्पच आहेत. असेच चित्र सगळीकडे दिसत आहे.
याच योजनेत समृद्ध ग्राम योजनेत १६00 एवढे उद्दिष्ट आहे. २८८ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यापैकी १९ सुरू असून ९0 कामे पूर्ण झाली आहेत. तर १७९ कामे ठप्प आहेत.