पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:31 AM2021-02-16T04:31:26+5:302021-02-16T04:31:26+5:30
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल आठ ते ...
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल आठ ते दहा महिने शाळा, महाविद्यालये बंद होती. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे; मात्र व्यवहार सुरळीत करण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सुरुवातीला ९ वी ते १२ वी व त्यानंतर ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता शासनाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोमवारी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये सुरू होतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती; मात्र प्रत्यक्षात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वगळता मोजक्याच वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी महाविद्यालयात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. महाविद्यालये सुरू करण्यासाठीचे पत्र विद्यापीठाने पाठविले असले काही महाविद्यालयांनी जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे काही महाविद्यालये उघडली असली तरी विद्यार्थी मात्र महाविद्यालयात आली नव्हती.
महाविद्यालयात कोरोना नियमांचे पालन
जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षण, सामाजिक शास्त्र, पत्रकारिता आदी शाखा असलेले महाविद्यालय आहेत. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्याचे जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयांनी वर्गाचे निर्जंतुकीकरण केले, तसेच सोमवारी विद्यार्थी महाविद्यालयात आल्यानंतर तासिकेसाठी शारीरिक अंतर ठेवून आसन व्यवस्था करण्यात आली होती.
.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सूचनेनुसार सोमवारी कै. डाॅ. शंकरराव सातव महाविद्यालय सुरू करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता, तसेच कोरोना नियमाचे पालन करून तासिका घेण्यात आल्या. अनेक दिवसांनंतर विद्यार्थी महाविद्यालयात आल्याने परिसर फुलून गेला होता.
-प्राचार्य डाॅ. बी. टी. पवार, कै. डाॅ. शंकरराव सातव महाविद्यालय, कळमनुरी.
खूप दिवसांनंतर महाविद्यालयात आलो होतो. ऑनलाइन क्लासेस सुरू असले तरी प्रत्यक्ष वर्गात बसून अध्यायनाचा अनुभव वेगळाच असतो. खूप दिवसांनंतर मित्रही भेटले. मी नियमित महाविद्यालयात येणार आहे.
-अक्षय सोनटक्के, विद्यार्थी.
महाविद्यालयात आल्यानंतर मित्रांशी गप्पा मारल्या. त्यानंतर तासिकेला उपस्थित राहिलो. खूप दिवसांनंतर वर्गात बसून प्राध्यापकांसोबत चर्चा करता आली. ऑनलाइन अभ्यासापेक्षा वर्गात बसून ऐकलेले लेक्चर जास्त समजते.
-राजकुमार तांबिले, विद्यार्थी.